हत्तींच्या पुतळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या मायावती यांना सुप्रीम कोर्टाचा दणका


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  हत्तींच्या पुतळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या मायावती यांना सुप्रीम कोर्टाने चपराक लगावली आहे. या कामांसाठी खर्च केलेला निधी तुम्हीच भरावा, असे सुप्रीम कोर्टाने मायावतींना म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असताना स्वत:च्या आणि पक्षाचे चिन्ह असलेल्या हत्तींच्या पुतळ्यावर मायावती यांनी  दोन हजार कोटी खर्च केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठासमोर २००९ मधील जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. मायावती आणि उत्तर प्रदेश सरकारविरोधात पुतळ्यांसंदर्भात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने मायावतींना फटकारले आहे. ‘मॅडम मायावती, हत्तींच्या पुतळ्यांवर सरकारी तिजोरीतून खर्च केलेला निधी तुम्ही स्वत:च्या खिशातून भरावा’, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २ एप्रिल रोजी होणार आहे.
मायावती सरकारने २००८- ०९ आणि २००९ – १० या कालावधीत पुतळ्यांवर दोन हजार कोटी खर्च केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. जनतेच्या पैशांचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर करण्यात आला असून उत्तर प्रदेशमधील सांस्कृतिक विभागासाठीचा ९० टक्के निधी हा पुतळ्यांवर खर्च करण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
जून २००९ मध्ये या याचिकेवर पहिल्यांदा सुनावणी झाली. गेल्या १० वर्षांमध्ये १७ वेळा या याचिकेवर सुनावणी झाली. विविध खंडपीठांसमोर ही सुनावणी झाली. पुतळ्यांप्रकरणी नुकतेच सक्तवसुली संचालनालयाने बहुजन समाज पक्षाशी संबंधित ९ जणांच्या घरांवर छापा देखील टाकला होता.  Print


News - World | Posted : 2019-02-09


Related Photos