सामाजिक, आर्थिक दृष्टीकोणातून मुलींना पुढे जाण्यास मदत करावी : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम


- गडचिरोली येथे आत्मसुरक्षा सामुहिक प्रदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विविध क्षेत्रात मुलींना पुढे जाण्यासाठी घरातूनच अडचण निर्माण होत आहे. यामुळे ही मानसिकता बदलून सामाजिक व आर्थिक दृष्टीकोणाला महत्व देवून मुलींना पुढे जाण्यास मदत केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास, वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी केले.
निर्भय बेटी सुरक्षा अभियान शाखा गडचिरोली व नगर परिषद गडचिरोलीच्या वतीने धानोर मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज स्मृती ७  वे मुलींचे आत्मसुरक्षा सामुहिक प्रदर्शन समारोहाप्रसंगी उद्घाटक म्हणून ना. राजे अत्राम बोलत होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक प्रमोद पिपरे, नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे, नगरसेवक केशव निंबोड, नगरसेविका लता लाटकर, डाॅ. महेश कोपुलवार, निर्भय बेटी अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर गुरव, डाॅ. सुलोचना मडावी, कमलदीप सिंग, डाॅ. देविदास मडावी, संजय कट्टमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. आत्राम म्हणाले, निर्भय बेटी सुरक्षा अभियान समितीचे कार्य अनेक वर्षांपासून सुरू असून हजारो मुलींना आत्मसुरक्षेसाठी तयार केले आहे. यामुळे मोठमोठ्या क्षेत्रात प्रगती साधत आहेत. जिल्ह्यातील मुली किक बाॅक्सिंग सारख्या खेळात सुवर्णपदके पटकावून जिल्ह्याचे नाव जगात उंचावत आहेत. देशात मुलींची संख्या वाढावी याकरीता सरकारने बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना सुरू केली. यामुळे मुलींचा जन्मदर वाढला. मुलींना शासनाने विविध अधिकार बहाल केले आहेत. मुलींचे महत्व समजू तरच देश पुढे जाईल. शिक्षण घेतो ते निरंतर प्रत्यक्षात करत रहावे. ज्या क्षेत्रात प्रगती करायची आहे त्यात लक्ष केंद्रीत करावे, आपण पाहिजे ते सहकार्य करू, असेही ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम म्हणाले.
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना नगराध्यक्षा योगिताताई पिपरे म्हणाल्या, मुलींनी आत्मनिर्भर असायला पाहिजे. समाजात वावरताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची ताकद मुलींनी स्वतःमध्ये निर्माण करावी, असेही योगिताताई पिपरे म्हणाल्या. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-09


Related Photos