महत्वाच्या बातम्या

 शासन आपल्या दारीचे अर्धेअधिक लक्ष्य पूर्ण : योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 50 टक्के लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यात आला आहे. योजनेसाठी अजून काही दिवसांचा अवधी असून यात शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.
कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते.  शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवत असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकासप्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हेच लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळावेत  यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जात आहे.


सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. हा उपक्रम नागपूर जिल्ह्यातही राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळत आहेत. राज्यातील लाखो गरजू व्यक्तींना या माध्यमातून लाभ मिळणार आहे.
नागपूर जिल्ह्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ही 3 लाख 14 हजार 556 निश्चित करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत सुमारे 1 लाख 53 हजार 15 लाभार्थ्यांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यात आला आहे. अजून 15 दिवस शिल्लक असून या पंधरा दिवसात शंभर टक्के लाभार्थी पूर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.


आतापर्यंत नागपूर ग्रामीण, रामटेक, कळमेश्वर या तालुक्यांनी आपले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे. नागपूर सुधार प्रन्यास, महसूल, जिल्हा परिषद, सामाजिक न्याय आदी विभागांच्या लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यात आला आहे.


जिल्हा अव्वलस्थानी आणा : जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर
नागपूर जिल्हा हा शासन आपल्या दारी या उपक्रमात अव्वलस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे. आतापर्यंत या उपक्रमाला जनतेकडून चांगले सहकार्य मिळाले आहेत. अजून काही दिवस या उपक्रमासाठी शिल्लक आहेत. प्रशासनाला जनतेची साथ मिळाल्यास योजना तळागाळापर्यंत पोहोचवून राज्यात जिल्हा या उपक्रमामध्ये अव्वलस्थानी आणता येणे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी म्हटले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos