गडचिरोली आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी त्रस्त


- वेळेवर बसेस सुटत नसल्याने प्रवासी असतात ताटकळत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक आगारातून बसेसचे योग्य प्रकारे नियोजन होत नसल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. तासन् तास बसेसची वाट पाहूनही वेळेवर बसेस सोडल्या जात नाहीत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गडचिरोली आगारातून अहेरी, सिरोंचा, नागपूर, चंद्रपूर तसेच इतरही लांब अंतरावरील शहरांमध्ये तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बसेस सोडल्या जातात. मात्र बसेसचे योग्य नियोजन नाही. ठरलेल्या वेळेनुसार बसेस सोडल्या जात नाहीत. ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस चालक, वाहक उपलब्ध नसल्याचे कारण देवून रद्द केल्या जातात. अहेरी, सिरोंचा करीता दर एक तासाला बसेसची आवश्यकता आहे. अहेरी उपविभागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र दुपारी १२ वाजतानंतर बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना सायंकाळपर्यंत ताटकळत रहावे लागते. तसेच लांब पल्ल्याच्या बसेससुध्दा वेळेवर सोडल्या जात नाहीत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. 
सध्या गडचिरोली आगारात नवीन फलाट बांधकाम सुरू आहे. हे काम अत्यंत दिरंगाईने होत असल्यामुळे प्रवाशांना उभे राहण्यासाठी सुध्दा त्रास होत आहे. तसेच प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे. बसेस नियोजित ठिकाणी लावल्या जात नसल्यामुळे वारंवार चौकशी करावी लागत आहे. या संपूर्ण प्रकाराकडे आगार व्यवस्थापकांनी लक्ष देवून प्रवाशांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-08


Related Photos