महत्वाच्या बातम्या

 सिकलसेलवर पहिले बोनमॅरो ट्रान्सप्लांट : ७ वर्षाच्या मुलाला मिळाले जीवनदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सिकलसेल म्हणजे, रक्तातील लाल पेशींचा रोग. या आजारावर अद्याप कोणतेही प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र, बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी हा उपचार करून एका ७ वर्षीय मुलाचे सिकलसेल समूळ नष्ट केले. मध्य भारतात पहिल्यांदाच ही उपचार पद्धती वापरल्याचा दावा नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने केला आहे.

सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार. यात रुग्णाच्या शरीरातील रक्त पेशी गोल आकाराऐवजी विळ्याच्या आकारासारख्या होतात. जिवंतपणीच मरणयातना देणारा आजार म्हणूनही ओळखले जाते. छत्तीसगड येथील एका ७ वर्षीय मुलाला गंभीर प्रकारातील सिकलसेल होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याला ब्रेन स्टोक आला. यामुळे प्रकृती खालावली. पालकांनी त्याला नागपूरच्या न्यू इरा मदर ॲण्ड चाइल्ड हॉस्पिटल मध्ये दाखल केले. येथील वरिष्ठ सल्लागार व लहान मुलांचा हेमेटोलॉजी-ऑन्कोलॉजी ॲण्ड बीएमटी चे प्रमुख डॉ. आतिश बकाने यांनी तपासले. मुलाचा जीव वाचविण्यासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी करण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडून परवानगी येताच या नव्या उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णाला नवे आयुष्य दिले.

- मोठ्या बहिणीचे स्टेम सेल जुळले

डॉ. बकाने यांनी सांगितले, या उपचारात रुग्णाशी जुळणारा स्टेमसेल दाता शोधणे व मोठा खर्च हे दोन मोठे आव्हान होते. सुदैवाने खर्चासाठी सीएसआर निधी मिळाला. सोबतच रुग्णाच्या मोठ्या बहिणीचे स्टेम सेल जुळले. रुग्णावर ॲलोजेनिक बोनमॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले. ही एक मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परंतु हृदय शल्यचिकित्सक डॉ आनंद संचेती, हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद भुतडा यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्टरांसह प्रशिक्षण आणि कौशल्यप्राप्त चमूमुळे रुग्णाला नवे आयुष्य मिळाले. ३० दिवसांनंतर म्हणजे, आज सोमवारी रुग्णाला सुटी देण्यात आली.

- हिमोग्लोबीनच्या विविध आजारात आशेचे किरण

डॉ. बकाने म्हणाले, याआधी नागपुरात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा कर्करोगाच्या रुग्णावर ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट झाले. बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी या उपचार पद्धतीमध्ये सुसंगत दात्याकडून निरोगी ‘हेमॅटोपोएटिक स्टेम सेल चा वापर झाला. यामुळे ही नागपुरातीलच नव्हे तर मध्य भारतातील पहिली पहिली यशस्वी ॲलोजेनिक बीएमटी ठरली. आता या उपचार पद्धतीमुळे रक्ताचा आजार असलेल्या रुग्णांना मुंबई, हैदराबादला जाण्याची गरज नाही.





  Print






News - Nagpur




Related Photos