भामरागड तालुक्यात नक्षल्यांकडून १५ दिवसांत पाच जणांची हत्या


- नक्षल्यांकडून हत्यासत्र सुरूच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यात नक्षल्यांकडून निष्पाप नागरीकांना पोलिस खबरी ठरवून बळी घेण्याच्या घटना घडतच असून १५ दिवसात नक्षल्यांनी पाच जणांना ठार केले आहे. यामुळे तालुक्यात नक्षल्यांची दहशत निर्माण होत आहे. काल ६ फेब्रुवारी रोजी आनंदराव मडावी याची हत्या केली. तर याआधी २२ जानेवारी रोजी कसनासूर येथील तिघांची नक्षल्यांनी हत्या केली होती. तसेच ३० जानेवारी रोजी हिचनगुडा येथील वाले वंजा कुडयामी याची नक्षल्यांनी हत्या केली होती.
काल ६ फेब्रुवारी रोजी रात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान १५ ते २० नक्षली विसामुंडी येथे आले. त्यांनी आनंदराव सत्तु मडावी याच्या घराचे दार ठोठावून ‘दादा, दादा’ अशी हाक दिली. आनंदराव आणि पत्नी झोपेतून उठून बाहेर आले. यावेळी चार नक्षली त्यांच्या घरासमोर उभे होते. त्यांनी पाणी मागितले. यानंतर आनंदराव ला जंगलाच्या दिशेने घेवून गेले. पत्नी निरूपा हिने आपल्या पतीला कुठे घेवून जात आहात, अशी विचारणा केली. यावेळी उद्या सकाळी परत पाठवून देतो, असे सांगून आनंदरावला नेण्यात आले. याबाबत ग्रामस्थांना कोणतीही कल्पना नव्हती. पत्नी निरूपा हिने रात्री घडलेली घटना आपल्या दिराला सांगितली. यानंतर आनंदरावचा शोध घेण्यात आला. गावाबाहेर कत्तरनगट्टा मार्गावर आनंदरावचा मृतदेह आढळून आला. यानंतर नारगुंडा पोलिस मदत केंद्रात तक्रार देण्यात आली. आनंदराव हा पोलिस खबरी नसून उलट पोलिसांनीच त्याच्यावर कलम ११० भादंविनुसार गुन्हा दाखल केला होता. तसेच आनंदराव ६  जानेवारी पासून भामरागड येथे तारखेवर जात होता. यामुळे नक्षल्यांनी खोटा आरोप लावून हत्या केल्याचा आरोप आनंदरावच्या पत्नीने केला आहे.
आनंदराव याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आनंदरावच्या मृत्यूनंतर मुलांचा साभाळ कसा करायचा हा प्रश्न पत्नी निरूपा हिच्यासमोर उभा ठाकला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-07


Related Photos