वन्यजीवावंर शास्त्रोक्त पध्दतीने उपचारासाठी गडचिरोली येथे ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ निर्माण करा


- वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा वनांनी व्याप्त असून मोठ्या प्रमाणात वन्यजीव आढळून येतात. जिल्ह्यात दूर्मिळ होत चाललेला गिधाड, वाघ, बिबट, कोल्हा, लांडगा, अस्वल, हरीण, चितळ, सांबर, बंदर, शेकरू, रानम्हैस, निलगाय, जंगली कुत्रे, रानमांजर, मोर असे असंख्य वन्यजीव आढळून येतात. तसेच अजगर सारखे मोठे साप आढळून येतात.  अनेकदा हे वन्यजीव जखमी होतात. अशावेळी उपचारासाठी स्वतंत्र वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने वन्यजीवांना प्राण गमवावे लागत आहे. यामुळे गडचिरोली येथे ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’  सुरू करण्यात यावे, अशी मागणी वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात  एखादा दुर्मीळ पक्षी, वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास त्यांच्यावर उपचार करायचे कोणी व कोठे? हा मोठा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो. जखमी वन्यजिवांसह पक्ष्यांवर शास्त्रीय पद्धतीने औषधोपचार उपलब्ध करून देण्यासाठी शहरात ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ सुरू  करणे गरजेचे आहे.   विविध अपघातांमध्ये जखमी झालेले दुर्मीळ प्राणी, पक्षी तसेच तस्करीच्या उद्देशाने आणलेले वन्यजीव रेस्क्यू केल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याअगोदर त्यांच्यावर औषधोपचार करणे गरजेचे ठरते. सध्या वन्यजिवांवर पशुवैद्यकीय दवाखान्यात  उपचार केले जातात . मात्र उपचारानंतर शुश्रूषा करण्यासाठी   ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ उभारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. 
जिल्ह्यातील रस्ते मुख्यतः जंगलातून गेलेले आहेत. यामुळे वाहनांची वर्दळ असताना आवागमन करणारे अनेक वन्यप्राणी जखमी होतात. तसेच उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात आलेले वन्यप्राणी गावठी कुत्रे किंवा मानवाच्या चुकीमुळे जखमी होतात. अशावेळी पाहिते तेवढ्या लवकर प्राण्यांवर उपचार होत नाही. शेतकरी तसेच शिकारी जंगल परिसर, शेतशिवारात जाळे लावतात. यामुळेसुध्दा अनेक वन्यप्राणी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच साप सुद्धा जखमी अवस्थेत आढळून येतात. अशा प्राण्यांवर उपचार केल्यानंतर त्यांना देखरेखीत ठेवण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. तसेच मनुष्यबळ सुध्दा नाही. सध्या दिली जात असलेली वैद्यकीय सुविधा सुध्दा अपुरी आहे. यामुळे गडचिरोली येथे ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’  उभारणे अत्यंcत गरजेचे आहे. मागणीची दखल घेवून ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’  उभारण्यास तत्काळ  मंजूरी देण्यात यावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी केली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-07


Related Photos