भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांना चिचडोह बँरेजचे पाणी मिळणार


-  शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याला यश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
चिचडोह बँरेज चे काम पूर्ण होवून सदर प्रकल्पात पाणी अडविण्याचे काम सुरू होत असतानांही या प्रकल्पाचे पाणी परिसरातील शेतीला मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कोणतेही नियोजन केलेले नव्हते, त्यामुळे चिचडोह बँरेज चे पाणी शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता धुसर झालेली होती. सदरची बाब लक्षात घेऊन चिचडोह बँरेज चा शेतकऱ्यांना खऱ्या  अर्थाने शेतीकरिता फायदा होण्यासाठी चामोर्शी कालवा मंजूर करण्यात यावा अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस  रामदास जराते यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
निवेदनात  रामदास जराते यांनी मागणी केली होती की चामोर्शी कालवा मंजूर करून मार्कडा,फोकुर्डी, भेंडाळा, रामाळा, फराडा, मोहूर्ली,घारगाव, दोटकुली, खंडाळा, वाघोली, तुकुम, एकोडी, कान्होली, नवेगाव, कळमगाव, बोरी, भिक्शी, रामसागर, मुरखळा चक,मुरखळा बल्लू, वाकडी, नागपूर, सोनापूर, चामोर्शी,हळदी माल,हळदी चक,सगणापूर, कान्होली हेटी या गावासह परिसरातील ४५ गावातील शेतकऱ्यांना शेती साठी पाणी मिळण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. व त्यासाठी आवश्यक नियोजनाचा प्रस्ताव तयार करण्यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात यावे अशीही मागणी भाई रामदास जराते यांनी राज्याच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे केली होती.तसेच सदर प्रकरण मार्गी लावण्यासाठी सातत्याने मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला होता. शेकापच्या या पाठपुराव्याला यश आले असून जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार चंद्रपूरच्या लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सदर योजनेचा प्रकल्प अहवाल बनविणे सुरु केले असून साधारणतः २१३६ हेक्टर शेतीकरिता पाणी निहित करण्यात आले आहे. सदर पाण्याचा उपसा राजीव उपसा सिंचन योजनेतंर्गत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे.
 शेकापच्या पाठपुराव्याने सदर पाणी शेतीला मिळण्याची तरतूद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी  याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस  रामदास जराते, महिला नेत्या जयश्री वेळदा,गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम, रोहिदास कुमरे,तालुका चिटणीस दिनेश चुधरी, रमेश चौखुंडे,प्रदिप आभारे,दामोदर रोहनकर,गंगाधर बोमनवार,प्रकाश सहारे यांचे आभार मानले असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाणी मिळेपर्यंत आपला पाठपूरावा सुरुच राहणार असल्याची प्रतिक्रिया भाई रामदास जराते यांनी दिली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-07


Related Photos