दृष्टिहीनांना विविध मूल्यांच्या नोटा ,नाणी ओळखण्यास मदत करू शकेल असे ‘मोबाइल अ‍ॅप’ विकसित करण्याचा विचार करा


- उच्च न्यायालयाची रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाला सूचना 
वृत्तसंस्था / मुंबई
:  दृष्टिहीनांना विविध मूल्यांच्या नव्या नोटा आणि नाणी स्पर्शाने ओळखण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे दृष्टिहीनांना विविध मूल्यांच्या नव्या नोटा आणि नाणी ओळखण्यास मदत करू शकेल असे ‘मोबाइल अ‍ॅप’ विकसित करण्याबाबत विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने मंगळवारी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाला  केली. याबाबतची मागणी ‘नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड’ (नॅब) या संस्थेने जनहित याचिकेद्वारे केली आहे.
 नोटांवरील विशिष्ट खुणा नष्ट होणार नाहीत आणि नोटा सुस्थितीत, स्वच्छ राहतील याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता करण्याचेही न्यायालयाने या वेळी प्रामुख्याने स्पष्ट केले.  
मंगळवारच्या सुनावणीत विविध मूल्यांच्या नोटांमधील फरक दृष्टिहीनांना ओळखता वा त्या ओळखण्यास मदत करू शकेल, असे उपकरण तयार करण्यात येत आहे. त्यासाठीच्या निविदाही मागविण्यात येत आहेत, अशी माहिती रिझव्‍‌र्ह बँकेने न्यायालयाला दिली. शिवाय १०० आणि त्यावरील मूल्यांच्या नोटांचे स्वरूप हे असे आहे की, त्या नोटांचे मूल्य स्पर्शाने दृष्टिहीनांना सहजपणे ओळखता येईल, असा दावाही केला. त्यानंतर हे उपकरण तयार करण्याची प्रक्रिया जलद गतीने करण्याचे आदेश मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने रिझव्‍‌र्ह बँकेला दिले. त्याच वेळी पाश्चिमात्य देशांमध्ये दृष्टिहीनांना नोटा वा नाणी ओळखता यावीत यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, हे तपासण्याची सूचनाही न्यायालयाने केली. शिवाय अमेरिकेत विविध मूल्यांच्या नव्या नोटा आणि नाणी ओळखण्यास दृष्टिहीनांना मदत करणारे ‘मोबाइल अ‍ॅप’ विकसित करण्यात आले आहे. हेच ‘मोबाइल अ‍ॅप’ आपल्याकडे विकसित करण्याबाबत का विचार करत नाही, अशी सूचनाही न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला केली.   Print


News - Rajy | Posted : 2019-02-06


Related Photos