मुरूमगावात महिलांनी केला दारू व सडवा नष्ट, रॅली काढून थेट २५ विक्रेत्यांच्या घरी धडक


-  विक्रेत्यांविरुद्ध संताप : पोलिसांच्या सहकार्याने अहिंसक कृती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  धानोरा :
तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या मुरूमगाव येथे मंगळवारी महिलांनी दारूविक्रीबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांच्या सहभागातून रॅली काढली. यावेळी जनजागृती करतानाच थेट विक्रेत्यांच्या घरी धडक देत दारूसाठे, मोहसडवा नष्ट करीत साहित्याची होळी महिलांनी केली.
मुरूमगाव येथील दारूविक्री बंद होण्यासाठी येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी गावातील इतर महिला व पुरुषांना संघटीत करून काहीच दिवसांपूर्वी ग्रामसभा घेतली. यावेळी गावातील दारूविक्री पूर्णतः बंद करण्याचा ठराव ग्रामसभेने घेतला. पण या निर्णयाला न जुमानता गावात दारूविक्री सुरूच होती. त्यामुळे महिलांनी शाळेतील विद्यार्थी आणि पोलिसांच्या सहकार्याने दारूविक्री बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी गावात मंगळवारी जनजागृती रॅली काढली. दारूविक्री करणाऱ्यांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. दारू विक्री व न पिण्याचे आवाहन महिला आणि विद्यार्थ्यांनी केले.
एवढ्यावरच न थांबता महिलांनी जवळपास २५ दारूविक्रेत्यांच्या घरी धडक देत पोलिसांच्या सहकार्याने दारूसाठा आणि मोहसडवा जप्त करून तो नष्ट केला. त्याचबरोबर दारू गाळण्यासाठी वापरात येत असलेल्या साहित्याची होळी केली. मुरूमगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली. यापुढे विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. धानोरा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड हे दारूबंदीसाठी आग्रही असून त्यांच्या मार्गदर्शनात सातत्याने धाडी घातल्या जात आहे. दारूविक्री बंद करण्यासाठी महिला संघटनांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून सातत्याने कारवाईसाठी ते प्रयत्नशील आहेत.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-06


Related Photos