गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँकेचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या निकषावर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक म्हणून राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सोहळ्यात जिल्हा बँकेला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार व मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्ष सुप्रिया पाटील, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर आदी उपस्थित होते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जिल्ह्यात ५५ शाखांच्या माध्यमातून चार लाख ग्राहकांना बँकींग सेवा दिली जात आहे. बँकेकडे सद्य:स्थितीत १ हजार ४५० कोटींच्या ठेवी असून १ हजार ३० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बँकेच्या सर्व शाखा सीबीएस प्रणालीवर मुख्य कार्यालयाशी जोडलेले आहेत. जिल्हाभरात बँकेचे ३० एटीएम असून ग्राहकांना मोबाईल बँकींग, आयएमपीएस सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. जिल्ह्यातील व्यवसाय प्रतिनिधीच्या माध्यमातून जिल्ह्यात १५० मायक्रो एटीएम स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे रक्कम काढणे, जमा करणे, शिल्लक रकमेची माहिती, मिनी स्टेटमेंट फंड ट्रॉन्सफर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बँकेतर्फे शेतकरी सभासदांना १ लाख रूपे एटीएम कम डेबीट कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी नाबार्डच्या सहाय्याने जिल्ह्यातील २१० गावांमध्ये आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बँकेला नुकताच ‘बँको ब्ल्यू रिबन’ सन २०१८ च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-06


Related Photos