महत्वाच्या बातम्या

 खांबाड्यात भरली जत्रा शासकीय योजनांची : सर्वसामान्यांच्या विकासाची


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / खाबांडा : जि. प. प्राथमिक शाळा खाबांडा चे पटांगणात तालुका कृषी अधिकारी वरोरा व महसूल विभाग वरोरा च्या वतीने आयोजित 26 मे 2023 ला जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची व महाराजस्व अभियान अंतर्गत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती शिवनंदा लंगडापुरे उपविभागीय अधिकारी वरोरा, कु. स्नेहल रहाटे तहसीलदार वरोरा, शेरकी सरपंच खांबाडा, गजानन भोयर तालुका कृषि अधिकारी वरोरा, अमोल काचोरे ठाणेदार वरोरा इ. मान्यवर उपस्थित होते. 


या कार्यक्रमात तालुका कृषि अधिकारी कार्यालयाने बियाणे उगवणक्षमता व बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक, महाDBT अंतर्गत यांत्रिकीकरण व सूक्ष्म सिंचन, शेततळे करिता अर्ज भरून घेण्याकरिता मार्गदर्शन केले व फळबाग लागवड, PMFME, SMART कापूस प्रकल्प, खरीपपूर्व नियोजन व उत्पादकता वाढीच्या विविध तंत्रज्ञान विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यासोबतच मिशन जयकिसान अंतर्गत चित्ररथ फिरवून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.


विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी पुढे यावे असे आवाहन प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन केले. श्रीमती लंगडापुरे उपविभागीय अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याची ग्वाही आपल्या भाषणातुन दिली. कु स्नेहल रहाटे तहसीलदार यांनी महाराजस्व अभियान व महसूल विभागाच्या लोकोपयोगी योजना यावर प्रकाश टाकला. गजानन भोयर तालुका कृषि अधिकारी यांनी खरीपपूर्व नियोजन, विविध योजना व उत्पादकता वाढीचे तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमात महसूल विभागाने शिधापत्रिका वाटप, जात प्रमाणपत्र वाटप, व इतर प्रमाणपत्रे व दाखल्यांचे ग्रामस्थांना वाटप करून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.


या कार्यक्रमात परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महसूल विभागाच्या सर्व मंडळ अधिकारी व कर्मचारी तसेच कृषि विभागाचे मंडळ कृषि अधिकारी, सर्व कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांनी परिश्रम घेतले. राखी टिपले यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमातून उत्पादन वाढीकरिता व विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता निश्चित लाभ होईल असे समाधान शेतकरी तथा ग्रामस्थ यांनी व्यक्त केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos