महत्वाच्या बातम्या

 शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ द्या : खा. रामदास तडस


- वर्धा येथे शासन आपल्या दारी विशेष शिबिर
-  शिबिरात 2 हजार 220 लाभार्थ्यांना लाभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासन विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. या योजनांचा त्यांना एकाच ठिकाणी व कमी कालावधीत लाभ मिळाला पाहिजे, यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
शासन आपल्या दारी अभियानांतर्गत वर्धा तालुकास्तरीय विशेष शिबिर विकास भवन येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटक म्हणून श्री.तडस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ. पंकज भोयर होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी सुप्रिया डांगे, तहसिलदार रमेश कोळपे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश भगत, नायब तहसिलदार काळुबाई भागवत, अजय धर्माधिकारी, श्रीमती जाधवर आदी उपस्थित होते.
शासन आपल्या दारी अभियानात सहभागी होऊन नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे देखील खा. तडस यांनी सांगितले. आ.डॉ. पंकज भोयर यांनी शासन आपल्या दारी हा शासनाचा लोकाभिमुख उपक्रम असून त्याचा फायदा नागरिकांनी घेतला पाहिजे. विभागांनी देखील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अभियानात सहभागी करुन घ्यावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार रमेश कोळपे यांनी केले.
शिबिरात विविध शासकीय विभागांनी आपले स्टॉल लावले होते. लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यासोबतच शासकीय योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात आली. एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ देण्याचे अनुषंगाने हे शिबिर राज्यभर आयोजित केले जात असून त्याचा भाग म्हणून वर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात तहसिल कार्यालयामार्फत वाटणीपत्राचे 15 आदेश वितरीत करण्यात आले. निराधार अनुदान योजनेच्या 116 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. 200 लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले तसेच 237 विविध दाखल्यांचे देखील वितरण करण्यात आले. वर्धा तालुक्यातील विविध गावांसाठी निवड झालेल्या नवनियुक्त 14 कोतवालांना नियुक्ती आदेश देण्यात आले.
नगर परिषद वर्धाच्यावतीने 10 बचतगटांना 21 लाखाचे धनादेश वितरीत करण्यात आले. पंचायत समिती वर्धाच्यावतीने 1 हजार 449 विविध दाखल्यांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. आरोग्य विभागाच्यावतीने लावण्यात आलेल्या विशेष आरोग्य शिबिरात 215 लोकांची रक्त तपासणी करण्यात आली. कृषि विभागामार्फत कृषि अवजारांचे वितरण करण्यात आले. अशा प्रकारे विविध विभागांच्यावतीने शिबिरात एकुण 2 हजार 220 लाभार्थ्याना विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला. 





  Print






News - Wardha




Related Photos