सुरजागड पहाडीवरील लाॅयड मेटल कंपनीचे काम सुरू करा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लाॅयड मेटल कंपनीच्या वतीने सुरू असलेले काम बंद करण्यात आले आहे. यामुळे विविध विभागात कार्यरत कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तब्बल ७०० ते ८०० जणांच्या रोजगारावर गदा आली आहे. यामुळे लाॅयड मेटल कंपनीचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी आज ५ फेब्रुवारीपासून मजूरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.
मागील दोन वर्षांपासून सुरजागड येथील पहाडीवर लाॅयड मेटल कंपनीच्या वतीने काम सुरू होते. मात्र मागील १५ दिवसांपासून कोणतेही कारण न देता काम बंद करण्यात आले आहे. काम सुरू करण्याच्या मागणीसाठी १ फेब्रुवारी रोजी पत्र देवून काम सुरू करण्याची विनंती केली होती. काम सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र काम सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने आज उपोषण सुरू करण्यात आले आहे. 
शासन, प्रशासनाने कंपनीला तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, लाॅयड मेटल कंपनीने त्वरीत काम सुरू करावे, मजूरांना २५ दिवस काम द्यावे, कोनसरी येथे होत असलेल्या प्रकल्पात जास्तीत जास्त एटापल्ली तालुक्यातील व अहेरी उपविभागातील नागरीकांना प्राधान्य देण्यात यावे, प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करावे, सुरजागड पहाडीवर काम करणाऱ्या  मजूरांना कंपनीकडून विम्याचे संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. उपोषणात   असंख्य मजूर , महिला सहभागी झाल्या आहेत.

 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-05


Related Photos