नागभीड - नागपूर मार्गासाठी अर्थसंकल्पात केवळ १० हजारांची तरतूद


- शासनाकडून केली जात आहे थट्टा, मार्गासाठी ७०८ कोटींची गरज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना नॅरोगेज चे ब्राॅडगेज मार्गामध्ये रूपांतर करण्याची परवानगी मिळालेल्या नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गासाठी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पात केवळ दहा हजारांची तरतूद करून थट्टा करण्यात आली आहे. यामुळे या मार्गाचे आत्ताही काही होणार नसल्याचे सिध्द झाले आहे. या मार्गासाठी ७०८ कोटी ११ लाखांचा खर्च असून केवळ दहा हजारांची तरतूद करणे कितपत योग्य आहे, असा संतापजनक प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ममता बॅनर्जी यांच्या काळात ब्राॅडगेज करण्याची परवानगी मिळालेल्या या मार्गासाठी प्रत्येक वेळी अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नाही. दरम्यान केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर नागरीकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनीसुध्दा निवडणूकीनंतर काही दिवसात नागभिड येथे रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र काहीही उपयोग झाला नाही. तब्बल साडेचार वर्षांचा कार्यकाळ लोटूनही या मार्गासाठी कोणतीही तरतूदच केली जात नाही. या मार्गासाठी लागणाऱ्या निधीपैकी निम्मा वाटा राज्य सरकारने उचलण्याची कबुली दिली. मात्र निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने घोडे अडलेलेच आहे.
मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे मार्गाचे ब्राॅडगेजमध्ये रूपांतर झाले. केवळ नागभीड - नागपूर या मार्गाचे काम थंडबस्त्यात आहे. या मार्गाचे ब्राॅडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मुल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा, आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरकडे जाणे सोयीचे होणार आहे.  

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-05


Related Photos