चामोर्शी तालुक्यातील पोलिस पाटील पदभरतीच्या परीक्षेत घोळ, परीक्षा रद्द करण्याची मागणी


- जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि आ. विजय वडेट्टीवार यांना दिले निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
चामोर्शी तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठी काल ३ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेमध्ये प्रचंड घोळ करण्यात आल्याचा आरोप काही उमेदवारांनी केला असून या प्रकरणी चौकशी करून परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि विधानसभेचे उपगटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उपविभागीय दंडाधिकारी चामोर्शी यांच्यामार्फत काल ३ फेब्रुवारी रोजी पोलिस पाटील पदाची परीक्षा चामोर्शी येथील बोमनवार हायस्कूलमध्ये घेण्यात आली. यावेळी खोली क्रमांक ९ मधील एक उमेदवार चक्क मोबाईलमधून उत्तरे पाहून पेपर सोडवत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी काही उमेदवारांनी आक्षेप घेत ही बाब पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. पर्यवेक्षकाने सबंधित उमेदवाराचा मोबाईल ताब्यात घेवून पूर्ववत पेपर सोडविण्यासाठी दिला. मात्र पेपरची वेळ संपल्यानंतर व सर्व उमेदवार गेल्यानंतर पर्यवेक्षकांनी परत त्या उमेदवाराला बोलावून पेपर सोडविण्यासाठी दिला. यावरून या परीक्षेत अनेकांनी गैरप्रकार केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारामुळे योग्य व हुशार उमेदवारांवर अन्याय झाला आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून परीक्षा रद्द करावी व नव्याने परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करण्यात आली. या प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी दिले आहे. तसेच याबाबत आपण वरीष्ठ स्तरावर आवाज उठवू, असे आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-04


Related Photos