२२ वर्षांपासून बेपत्ता व्यक्तीची कोठारी पोलिसांनी घडवून दिली कुटुंबियांशी भेट


- इंटरनेटच्या माध्यमातून सापडला कोठारीचा पत्ता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका / चंद्रपूर :
तब्बल २२ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीची भेट घडवून आणण्यात कोठारी पोलिस यशस्वी झाले आहेत. कोलकात्ता येथून सुखरूप ताब्यात घेवून त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील रहिवासी असलेले राजाराम पोचुजी बोनगिरवार (४१) हे १९९८ साली अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी बराच शोध घेतला. मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी कोठारी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आठ दिवसांपूर्वी कोलकत्ता काॅकद्रिप येथील रहिवासी अम्रीश नागबिश्वास यांचा कोठारीचे ठाणेदार संतोष अंबिके यांच्याशी संपर्क झाला. नागबिश्वास यांनी ठाणेदारांना मकरसंक्रांती मेळाव्यात गंगासागर येथे एक वृध्द आढळून आला असून तो फक्त कोठारी असे सांगत असल्याचे सांगितले. कोठारी इंटरनेटवर शोधले असता चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारीची माहिती मिळाली, असल्याचे सांगितले. ठाणेदार अंबिके यांनी लंगेच १९९८ साली बेपत्ता असलेल्या इसमाबाबत माहिती काढली. राजाराम बोनगिरवार हे बेपत्ता असल्याचे आढळून आले. ठाणेदारांनी अंब्रीश बिश्वास यांना माहिती दिली. चौकशीनंतर राजाराम बोनगिरवार हिच व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले. 
सदर माहिती पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना मिळताच त्यांनी तत्काळ कोलकत्ता येथे पोलिस पथक रवाना केले. कोलकात्ता येथे तपास पथक पोहचून कोलकात्ता येथून राजाराम बोनगिरवार यांना घेवून काल ३ फेब्रुवारी रोजी चंद्रपूरात दाखल झाले. मानसिक अस्वास्थ्यामुळे राजाराम बोनगिरवार हे २२ वर्षांपूर्वी घरदार सोडून , संसार सोडून भटकत राहिले.
अखेर २२ वर्षांनंतर पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देवून राजाराम यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी कुटूंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. २२ वर्षानंतर घरातील व्यक्ती परत मिळाल्याने बोनगिरवार कुटूंबीय भावूक झाले होते. सदर कामगीरी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार शामराव पुलगमकर, पोलिस शिपाई विनोद निखाडे यांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-04


Related Photos