भातुकलीच्या खेळात पेटविल्या चुलीने घेतला तीन चिमुरड्यांचा बळी


वृत्तसंस्था / सांगली :  गोट्यामध्ये भातुकलीचा खेळ खेळत असताना छोट्या चुलीत पेटविल्या आगीने पेट घेतल्याने लागलेल्या आगीमध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील  भोकरदनच्या क्षीरसागर गावात  घडली आहे. या संपूर्ण घटनेमुळे   हळहळ व्यक्त केली जात आहे.  आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. वेदांत विष्णू मव्हारे (८), सार्थक मारुती कोलते ( ६), संजीवनी गजानन मव्हारे (३ ) अशी मृत मुलांची नावे आहेत.
गुरांच्या गोठ्यामध्ये ही लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत होती. त्यावेळी खेळताना छोट्याशा चुलीत चिमुकल्यांनी लावलेल्या आगीने गोठ्यातील चाऱ्याने पेट घेतला. आगीची तीव्रता अचानक वाढल्याने या चिमुकल्यांना बाहेर पडता आलं नाही. यामुळे घाबरून या मुलांनी शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला. मात्र आग वाढत जाऊन तिने या शेडला कवेत घेतले. शेडला एक दरवाजा होता आणि त्या मार्गातच आग लागल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यातच आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं, पण या आगीत तिन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले .    Print


News - Rajy | Posted : 2019-02-04


Related Photos