रस्ता सुरक्षा दैनंदिन जीवनाचा भाग असावा – जिल्हाधिकारी


-रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल. चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट व दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो, यामुळे अपघात होतात. परिणामी मृत्यु ओढवू शकतो. रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा भाग झाल्यास रस्त्यावरील अपघातात कमी येईल, असे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी व्यक्त केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाच्या वतीने ३० वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ आज बहुउद्देशिय सभागृह पोलीस मुख्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस उपअधिक्षक बंडोपत बनसोडे, उपअभियंता श्री. धार्मिक, यंत्र अभियंता गजानन नागुलवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे,  पोलीस निरिक्षक बाळकृष्ण गाडेव जनआक्रोश संस्था नागपूरचे अनिल नखाते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दीप प्रज्वलन करुन रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ केला. मोटार वाहन अपघातात प्रत्यक्षदर्शी किंवा साक्षीदार हे पोलीसांचा ससेमीरा मागे लागू नये म्हणून अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अपघातातील जखमी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नाही व एखादया व्यक्तीस आपला प्राण गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेता सवोच्च न्यायालयाने मदत करणाऱ्या व्यक्तीस कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जर अशी व्यक्ती ही स्वत:हून मोटार वाहन अपघातातील प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे सांगत असेल व स्वत:हून साक्षीदार बनण्यास तयार असेल तरच त्या व्यक्तीचा जबाब साक्षीदार म्हणून नोंदविण्यात येईल. अशी व्यक्ती जबाब नोंदविण्यास तयार नसेल तर पोलीसांकडून दबाव आणला जाणार नाही. जबाब नोंदविण्यात तयार असलेल्या व्यक्तीस पोलीस तपासकरीता किंवा कोर्टात साक्षीकरीता बोलवावयाचे असल्यास केवळ एकच वेळ बोलविण्यात येईल. त्यास कोणत्याही प्रकार त्रास होणार नाही यांची खबरदारी घेण्यातयेईल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, मदत करणाऱ्या नागरिकांना पारितोषिक देण्याची योजना परिवहन विभागाने सुरु करावी. 

मागील वर्षी जिल्हयात अपघाताचे प्रमाण ४६२ वरुन ४१३ वर आले आहे. तर रस्ते अपघातात मृत्युची संख्या १६३ वरुन १५१ वर आली आहे. जिल्हयात १८ ब्लॅकस्पॉट असून या अपघात प्रवण स्थळाच्या दुरुस्तीचे काम केल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी प्रास्ताविकात दिली.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन आरती देशपांडे यांनी केले तर आभार मोटार वाहन निरिक्षक प्रमोद सरोदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत झाडे, मोहन बोर्डे, गोरख शेलार, प्रमोद सरोदे, अनिल तांबडे, व कार्यालयीन कर्मचारी यांनी परिक्षम घेतले. यावेळी विविध संघटना, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.  Print


News - Bhandara | Posted : 2019-02-04


Related Photos