महत्वाच्या बातम्या

 गोंदिया : प्राध्यापकाने यूजीसीला सादर केले नेटचे बोगस प्रमाणपत्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गोंदिया : देवरी तालुक्यातील सुरतोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तात्पुरते म्हणून रुजू झालेल्या प्राध्यापकाने संस्था सचिवाच्या व जुन्या प्राचार्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून प्रकरण यूजीसीला पाठविले. आपले प्राध्यापकपद कायम करण्यासाठी नेट झाल्याचे बोगस प्रमाणपत्र यूजीसीला सादर केले. त्या प्राध्यापकासह त्याला मदत करणाऱ्या दुसऱ्यावरही देवरी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरतोली लोहारा येथील सचिव राजकुमार केवळराम मडामे (४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन २०१२ मध्ये आरोपी तथागत प्रल्हाद गजभिये (३३) याची लिपिक म्हणून नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात केली. त्यानंतर सन २०१६ मध्ये आरोपी राहुल तागडे याची मराठीचे प्राध्यापक म्हणून तात्पुरती स्वरूपाची नियुक्ती केली होती परंतु या दोन्ही आरोपींनी संस्था सचिवाला माहीत न करता खोटे कागदपत्र तयार करून स्वतःला पूर्णकालीन प्राध्यापक दाखविले. 

सन २०१९ मध्ये कोरोनाकाळात संस्था सचिव राजकुमार मडामे हे महाविद्यालयात गेल्यावर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. आरोपींनी संस्था सचिवाच्या खोट्या सह्या करून प्रस्ताव विद्यापीठाला पाठविला. खोट्या सह्यांच्या आधारे स्वतःची नियुक्ती करून घेतली. आरोपीने नेटचेही प्रमाणपत्र बोगस जोडून विद्यापीठाच्या ग्रँड कमिशन यूजीसी दिल्लीकडे पाठविले. बनावट कागदपत्र पाठवून दिशाभूल करणाऱ्या तथागत प्रल्हाद गजभिये व राहुल तागडे या दोघांवर देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक घाडगे करीत आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos