महत्वाच्या बातम्या

 अमरवेल तणाचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : गेल्या काही दिवसांमध्ये अमरवेल या तणाचे प्रमाण वाढत आहे. सोयाबिनसह मिरची, मूग, उदीड, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर सुध्दा अमरवेलीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या तणाचे एकात्मिक व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.           

अमरवेल हे कंदमुळे वर्गातील वार्षिक पर्णहीन पिवळसर रंगाची गुंडाळणरी वनस्पती आहे. हे तण संपूर्ण परोपजीवी असून जगण्यासाठी द्विदल पिकांवर अवलंबून असते. द्विदल पिकासोबत द्विदल तणावर सुध्दा आपले जीवनचक्र पूर्ण करतो. सद्यःस्थितीत विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पीकावर या तणाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येत असून मिरची, मूग, उदीड, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर सुध्दा अमरवेलीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

बाल्यावस्थेत असतांना या तणाचा वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर चिटकतो व जमिनीपासून विलग होतो. मात्र त्यानंतरही त्यावरील सुक्ष्म दातासारख्या असणाऱ्या होस्टुरियाच्या सहाय्याने दुसऱ्या झाडातील अन्नद्रव्ये शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडाची वाढ खुंटत जाते व परीणामतः उत्पादनात मोठी घट येते. अमरवेलाचे बी २० वर्षाहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते. त्यामुळे बिजोत्पादन अवस्थेपूर्व त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.

अमरवेलचे व्यवस्थापन करण्यासाठी एकाच पध्दतीवर अवलंबून न राहता एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे व्यवस्थापन करणे अनिवार्य ठरते. यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना व निवारणात्मक उपाय तसेच रासायनीक पध्दतीने व्यवस्थापन या सर्व बाबींचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये प्रमाणित किंवा तणविरहित बियाणे पेरणीसाठी वापरावे, पूर्ण कुजलेल्या शेणखताचा वापर करावा, शेताच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतावरील अमरवेल वेळीच वेगळा करून गाडून अथवा जाळून नष्ट करावा, कारण झाडापासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जिवंत राहतो, अमरवेलचा प्रादुर्भाव असलेल्या शेतामधील औजारे स्वच्छ केल्याशिवाय नवीन शेतात वापरू नये.

अमरवेलच्या निवारणात्मक उपाययोजनांमध्ये खोल नांगरणी करावे. जांभूळवाही देऊन उगवण अवस्थेतील तण नष्ट करावे. पिकात वारंवार डवरणी व निंदणी करून पिक तणविरहित ठेवावे. पिकांची फेरपालट करणे सर्वात परीणामकारक ठरते. यासाठी ज्या शेतामध्ये आदल्यावर्षी या तणाचा प्रादुर्भाव असेल त्या ठिकाणी पुढील वर्षी तृणवर्गीय ज्वारी, मका, बाजरी, गहू या तृणवर्गीय पिकांची लागवड करावी. अमरवेल यजमान झाडाशिवाय जगू शकत नाही, त्यामुळे यजमान पिकांची लागवड ८ ते १० दिवस विलंब केल्यास अमरवेलीचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो.

तणनाशकाद्वारे अमरवेलचे व्यवस्थापन करावयाचे झाल्यास पीक पेरणी करावयाच्या २ ते ३ दिवस अगोदर आणि जमिनीत ओलावा असतांना फ्लुक्लोरॅलिन ४५ टक्के ईसी हे तणनाशक २.२ लिटर प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यामध्ये वापरावे. फवारणीनंतर वखराची हलकी पाळी अवश्य द्यावी. सोयाबीन, भुईमुग, तूर, उडीद, मुग या पिकांमध्ये उगवणपूर्व तणनाशक वापरावयाचे झाल्यास पेंन्डिमिथॅलीन ३० टक्के ईसी ३.३ लिटर प्रती हेक्टर ५०० लिटर पाण्यामध्ये पिकाची पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी फवारणीद्वारे वापरावे. पीक विरहीत क्षेत्रामधील ग्लायफोसेट किंवा ग्लुफोसिनेट अमोनीयम या बिननिवडक तणनाशकद्वारे अमरवेल नष्ट करावा. शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्राने सुचविलेल्या उपाययोजना करावे, असे कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos