शिक्षक भरतीची प्रत्यक्ष जाहिरात येईपर्यंत करणार बेमुदत आमरण उपोषण


- पुणे येथील शिक्षण संचालनालयासमोर डीटीएड, बीएड धारकांचे आंदोलन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पुणे :
२४ हजार रिक्त पदांच्या शिक्षक भरतीची जाहिरात येईपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशनने घेतला आहे. जाहिरात काढण्यात यावी तसेच लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहीतेपूर्वी प्रत्यक्ष नियुक्तीपत्र देण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. पुणे येथील शिक्षण संचालनालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित , अंशतः अनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांवर भरती प्रक्रिया पूर्ण करून लोकसभा आचारसंहीतेपूर्वी प्रत्यक्ष नियुक्तीपत्र देण्यात यावे.
शिक्षणाधिकारी यांच्या गलथान , भोंगळ कारभारामुळे बिंदुनामावली अद्यापही पूर्ण झाली नसून त्यासंदर्भात  सदर अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देवून रिक्त जागा पवित्र पोर्टलवर अपलोड करून भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी, सर्व प्रवर्गाला शिक्षक भरतीमध्ये समान संधी उपलब्ध करून तसेच सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व जागा एनसीटीई/ आरटीई नियमानुसार भरण्यात याव्यात. प्रत्यक्ष जाहिरात पवित्र पोर्टलवर येईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहिल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देताना संतोष मगर, प्राजक्ता गोडसे, परमेश्वर इंगोले, वैभव गरड, राहुल खरात, सुचित्रा मुळूक, सुधीर पाटील, योगेश महाजन, निलेश पाटील यांच्यासह शेकडो डीटीएड, बीएड धारक उपस्थित होते.

   Print


News - Rajy | Posted : 2019-02-04


Related Photos