घरफोडीच्या आरोपीस ब्रम्हपुरी पोलिसांनी केले जेरबंद, ४ लाख ५७ हजार रूपये हस्तगत


- अवघ्या २४ तासात चोरट्यास पकडले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
घरात ठेवलेली ४ लाख ६० हजारांची रक्कम चोरून नेल्याप्रकरणी अवघ्या २४ तासात ब्रम्हपुरी पोलिसांनी घरफोड्यास जेरबंद केले असून ४ लाख ५७ हजार रूपये चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आली आहे.
शरद तुळशिराम अडकणे रा. समतानगर वर्धा ह.मु. शेषनगर ब्रम्हपुरी असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ३१ जानेवारी रोजी अजय परमेश्वर गायकवाड रा. परडा जि. वर्धा ह.मु. आरमोरी रोड ब्रम्हपुरी यांनी ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. बेलदाटी चांदगाव मार्गावर वैभव लक्ष्मी नगरी येथे प्लाॅट विक्री चालू असल्याने बुकींगची रक्कम आल्यानंतर किरायाने राहत असलेल्या घरातील कपाटात ठेवण्यात येत होती. अजय गायकवाड यांनी ३१ जानेवारी रोजी सुध्दा ४ लाख ६० हजार कपाटात ठेवून कामाच्या ठिकाणी गेले. दुपारी २ वाजता कामावरून परत आल्यानंतर घराच्या दरवाजाच्या कुलूप व कपाटाचे कुलूप तोडलेले दिसले. तसेच कपाटातील ४  लाख ६० हजार रूपये चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्रम्हपुरी पोलिसांनी कलम ४५४ , ४५७ , ३८० भादंविनुसार गुन्हा दाखल केला.
ब्रम्हपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तपासचक्रे फिरविली. पोलिसांनी घटनेपासून फरार असलेला शरद तुळशिराम अडकणे याचा शोध सुरू केला. त्याला रात्रीच ब्रम्हपुरी रेल्वे स्थानकाच्या परिसरातून अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. तसेच ४ लाख ५७  हजार ६०० रूपये त्याने सध्या राहत असलेल्या घरातून पोलिसांना काढून दिले. त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मकेश्वर यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कुरसंगे, पोलिस हवालदार प्रशांत शेंदरे, पेठकर यांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-02-03


Related Photos