अण्णांच्या जीवाशी खेळू नका : उद्धव ठाकरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शाहरुख मुलाणी  / मुंबई :
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची सरकारने दखल घ्यावी अण्णांचे प्राण महत्त्वाचे असून सरकारने त्यांच्या जीवाशी खेळू नये असे कळकळीचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले आहे.
अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी अण्णांच्या ' आमरण उपोषणास ' शुभेच्छा देणारे पत्र पाठवावे हा प्रकार संतापजनक, तितकाच हास्यास्पद असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणतात, " अण्णांचा लढा भ्रष्टाचारविरोधी आहे व देशाचीच ती समस्या आहे, पण आमरण उपोषण करून प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लढा द्यावा व देशाला जाग आणावी. सध्या देशातील जनतेला गुंगीचे औषध देण्यात आले असून जनतेला त्या गुंगीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी. गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी हरिद्वारला प्रा. अग्रवाल उपोषणास बसले व त्यांच्या उपोषणाची दखल न घेता त्यांना मरू दिले. देशाची गंगा शुद्ध करण्यासाठी अण्णांनी उपोषण सोडावे व लढा उभारावा. जेथे शक्य आहे तेथे शिवसेना अण्णांना सोबत केल्याशिवाय राहणार नाही ! " असेही उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

   Print


News - Rajy | Posted : 2019-02-03


Related Photos