सुरजागड येथील बंद असलेले उत्खननाचे काम सुरू करा, मजूरांचे पालकमंत्री ना. आत्राम यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
गुरूपल्ली गावाजवळ १६ जानेवारी रोजी अपघात झाल्यानंतर काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरजागड प्रकल्पाचे काम बंद करण्याची मागणी करीत आंदोलन केले. यामुळे काम बंद करण्यात आले आहे. काम बंद असल्यामुळे मजूरांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. यामुळे सुरजागड येथील उत्खनन सुरू करण्यात यावे, अशी मागणी मजूरांनी  पालकमंत्री  ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून  केली आहे.  
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली हा देशातील अतिमागास जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. जिल्हा दुर्गम, आदिवासी, डोंगराळ आहे. त्यामुळे उद्योग विरहीत आहे. सीमावर्ती भागात असलेल्या छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा राज्यात येथील मजूर स्थलांतरीत होतात. नागरीकांच्या मागणीनुसार जनतेच्या हाताला काम मिळावे म्हणून सुरजागड लोहप्रकल्पाचे काम सुरू केले होते. यामुळे काही जणांना रोजगार उपलब्ध झाला होता. मात्र १६ जानेवारी रोजी झालेल्या अपघातानंतर काम बंद करण्याची मागणी करीत काही संधीसाधूंनी काम बंद पाडले. तसेच अपघातानंतर वाहतूक बंद केली. केवळ अपघात झाला म्हणून काम बंद पाडणे कितपत योग्य आहे. असे असेल तर मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. सुरजागड येथील काम सुरू करून बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा, अन्यथा ५ फेब्रुवारीपासून उपोषण करू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. 
निवेदन देताना प्रसाद नामेवार, मिथून जोशी, कुंदन आसुटकर, उमेश उसेंडी, बाबुराव दुर्वा, राकेश गुरालवार यांच्यासह मजूर उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-03


Related Photos