आता दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचे मानधन थेट खात्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  गतवर्षी मानधन देण्यास दिरंगाई झाल्याने यंदा मात्र दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचे मानधन थेट खात्यात जमा केले जाईल, असे आश्‍वासन राज्य मंडळाच्या विभागीय मंडळाने दिले आहे. यामुळे यावेळी शिक्षकांना मानधन वेळेत मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. 
दहावी व बारावी परीक्षेच्या पाश्‍वभूमीवर शिक्षक भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक या संघटनेची सहविचार सभा मुंबई विभागीय मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांच्या अध्यक्षेखाली पार पडली. गेल्यावर्षी शिक्षकांना पेपर तपासण्याचे मानधन अदा करण्यास बोर्डाकडून खूप दिरंगाई झाल्याचे शिक्षक भारतीने मंडळाच्या निदर्शनास आणून दिल्यावर खंडागळे यांनी यावर्षी अशी दिरंगाई परत होणार नाही व यासाठी सदर रक्कम परिक्षक व नियामक यांच्या खात्यात तत्काळ जमा करण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे कॅपदरम्यान त्याच त्याच शिक्षकांना तपासणीचे काम मंडळ देत असल्याचे प्रा. शरद गिरमकर यांनी निदर्शनास आणून दिले असता, सचिवांनी सदर कॅपप्रक्रिया रोटेशन पद्धतीने राबविण्याचे आश्वासन दिले. 
याशिवाय पीटी विषयाच्या तपासणीसाठी मानधन द्यावे, परीक्षक व नियामक यांना मानधनवाढ देणे, १२ व २४ वर्षांचे प्रशिक्षण नियमित राबवून वेळेत प्रमाणपत्र देणे याबाबत यावेळी चर्चा झाली. या सभेसाठी शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेजचे राज्याध्यक्ष आर.बी. पाटील, कार्याध्यक्ष ए.डी. जाधव, कार्यवाह सुरेश कोकीतकर, उपाध्यक्ष जी.टी. पाटील व महिला प्रतिनिधी प्रतिभा विश्वास व चव्हाण आदी उपस्थित होते.    Print


News - Rajy | Posted : 2019-02-03


Related Photos