महत्वाच्या बातम्या

 सार्वजनिक बांधकाम विभागावर गाजली आढावा बैठक


- रस्ते आणि साईड बंबचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आ. धर्मराव  बाबा आत्राम यांचे निर्देश

- अहेरी येथे तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय आढावा बैठक सार्वजनिक बांधकाम विभागावार चांगलीच गाजली.

२३ मे २०२३ रोजी घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय आढावा बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, प्रभारी तहसीलदार दिनकर खोत, गटविकास अधिकारी प्रतीक चव्हाण, मुख्याधिकारी नाना दाते, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, नायब तहसीलदार फारुख शेख, नायब तहसीलदार कल्पना सुरपाम, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रेमाराव लोखंडे आदी विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

सुरुवातीला आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी विविध विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेतली. विशेष म्हणचे आरोग्य, पशुधन विभाग, वीज वितरण विभाग, पाणीपुरवठा आणि कृषी विभागामार्फत पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची विस्तृत माहिती घेतानाच सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना कुठलीही अडचण भासणार नाही याची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. मृद व जलसंधारण विभागामार्फत सुरू असलेल्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान राबविण्यासाठी खेड्यापाड्यात जनजागृती करून योग्य पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

सध्या अहेरी तालुक्यात पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहरातील व शहरालगतचे रस्त्याचे अनेक कामे मंजूर असूनही दिरंगाई होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सदर विभागाला त्यांनी १५ दिवसाचे अल्टिमेटम दिले आहे. आलापल्ली ते मुलचेरा रस्त्याचे डांबरीकरण होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, त्या रस्त्यावर साईड बंबचे काम अध्यापही पूर्ण झाले नाही. सध्या त्या रस्त्यावर रहदारी वाढली असून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती लोकांची बळी घेणार ? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच अहेरी मुख्यालयातुन जाणारे चारही बाजूच्या रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करा असे सक्तीचे निर्देश त्यांनी दिले.

अहेरी ते खमनचेरु रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी गिट्टी टाकून ठेवले आहे. गिट्टीमुळे चारचाकी आणि दुचाकीस्वारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील गिट्टीमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र, काम अजूनही सुरू केले नाही. पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन करून त्वरित काम पूर्ण करा, असे निर्देश आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित विभागाला केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, इरफान पठाण, मखमुर शेख आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos