उमरेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /नागपूर
: बार आणि रेस्टाॅरंटमधील स्टाॅक रजिस्टर व बाॅटलचे बॅच क्रमांकाच्या रेकाॅर्डची तपासणी न करण्याकरीता व चालान कारवाई न करण्याकरीता १२ हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग उमरेड येथील निरीक्षक आणि शिपायाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय श्रीधर मिठारी (५२) असे निरीक्षकाचे तर बालाजी उत्तम राठोड (२७) असे शिपायाचे नाव आहे. तक्रारदार हिंगणा येथील बाॅर आणि रेस्टारंट मध्ये मागील १५ वर्षांपासून व्यवस्थापकाचे काम करतो. अंदाजे दोन महिन्यांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत शिपाई बालाजी राठोड हा हिंगणा येथील बारमध्ये येत होता. परंतु कधीच बारमधील स्टाॅक रजिस्टर, बिल, बाॅटलचे बॅच आदीची तपासणी केली नाही. मात्र २९ जानेवारी रोजी तक्रारदाराच्या बारमध्ये येवून तपासणी करून यापुढे रेकाॅर्डची तपासणी न करण्याकरीता महिन्याकाठी १ हजार रूपये व निरीक्षक मिठारी यांना ३ हजार रूपये असे एकूण ४ हजार रूपये द्यावे लागतील. तसेच नोव्हेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ या तीन महिन्याचे मिळून १२ हजार रूपये लाच देण्याची मागणी केली. याबाबत नागपूर एसीबीकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले. कारवाईदरम्यान निरीक्षक मिठारी, शिपाई राठोड यांनी १२ हजार रूपयांची लाच स्वीकारली. यावरून दोन्ही आरोपींविरूध्द आज २ फेब्रुवारी रोजी पोलिस ठाणे एमआयडीसी नागपूर शहर येथे कलम ७ (अ) लाचलुचपत प्रतिबंधक १९८८ (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गणेश कदम, पोलिस हवालदार सुनिल कळंबे, दिनेश शिवले, नापोशि मुंगेश कळंबे, अमोल फिस्के, चालक नापोशि मनोहर डोईफोडे यांनी केली आहे.

   Print


News - Nagpur | Posted : 2019-02-02


Related Photos