गाव बाल संरक्षण समितीशी संपर्कासाठी टोल फ्री क्रमांकावर सपंर्क साधावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून ० ते १८ वयोगटातील मुलांच्या संरक्षणाकरीता गावपातळीवर गाव बाल संरक्षण समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. गाव बाल संरक्षण समितीशी संपर्कासाठी १०९८,१०९१ या टोल फ्री क्रमांकावर किंवा महिला व बाल विकास कार्यालयाच्या ०७१५२२४२२८१ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
सदर समिती मुलांच्या संरक्षणाकरीता गाव पातळीवर संरक्षित वातावरण निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे कार्य करणार आहे. समितीने घेतलेला निर्णयात मुलांचे हित सर्वोत्तम असेल. संरक्षणाची गरज असणा-या बालकांचे शोषण करणा-या व्यक्ती कुटूंब आणि संस्था विरोधात भुमिका घेईल. गावातील निवडक जबाबदार नागरिकांचा गट जो गावातील मुलांकरीता सुरक्षित आणि पोषक वातावरण तयार करण्यास सहाय करणार आहे. योग्य त्या उपाययोजना आणि आराखडे तयार करुन त्यांची गाव पातळीवर अंमलबजावणी करण्यास सहाय करण्यात येणार आहे. बाल संरक्षणाविषयी स्थानिक आणि जिल्हा पातळीवर उपाययोजना शोधण्यास सहकार्य करेल.
सदर समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्यांचा प्रतिनिधी, सरपंच, पोलिस पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक, , शाळेतील शिक्षक, पालकांचे प्रतिनिधी, गावातील प्रेरक, प्रेरिका, अंगणवाडी सेविका, आशा, तसेच मुलाबरोबर काम करणा-या संस्थांचे प्रतिनिधी , गावातील बालकांच्या प्रति भुमिका घेणा-या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.
गाव बाल संरक्षण समिती मुलांच्या अधिकाराविषयी जनजागृती, मुलांच्या प्रश्नावर ग्रामसभेत चर्चा, गाव विकास प्रक्रियेत मुलांचा सहभाग,प्रत्येक मुल शाळेत जाण्यासाठी प्रयत्न, गावात बाल विवाह होणार नाही यासाठी जनजागृती आणि मुलीकरीता सुरक्षित वातावरण तयार करण्याचे कामे करतात. गावात विधी संघर्षग्रस्त किंवा कायदयाच्या कचाटयात सापडलेले मुलं असल्यास त्या मुलास सर्वोतापरी सहकार्य करणार आहे. मुलांच्या शोषणाचे प्रकरण गावात घडल्यास सर्वप्रथम मुलांचे म्हणने ऐकून घेऊन मुलांवर विश्वास व्यक्त करुन मुलांचे हित लक्षात घेऊन मुलांचे संरक्षाणाचे वातावरण निर्माण करणार आहे. गावात मजुरी आणि बाल विवाह विषयी जनजागृती करुन गावातील मुलांच्या प्रश्नाची तड लावण्यासाठी जिल्हा, राज्य पातळीवरील यंत्रणेसोबत समन्वय साधणार आहे. असे जिल्हा बाल सरंक्षण कक्ष अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha | Posted : 2019-02-02