सर्वसामान्यांसह शेतकरी, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना या अर्थसंकल्पामुळे सामाजिक व आर्थिक स्थैर्य : देवेंद्र फडणवीस


- भारताची २०३० पर्यंत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  :
  सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे, शेतकरी व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळवून देण्यासोबतच देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षातील केलेल्या कामगिरीचे या अर्थसंकल्पात प्रतिबिंब आहे. २०३० पर्यंत भारत कसा असेल व तिथे पोहचण्याचा मार्ग केंद्रीय अर्थसंकल्पात निश्चित केला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लक्ष्मीनगर येथील सायिंटीफीक सोसायटी लॉन येथे मनीबी इन्स्टिट्यूटच्यावतीने गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. इंडिया २०३० ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. यावेळी बीएसईचे सी वासुदेवन, अमीषी अरोरा, मनीबी इन्स्टिट्यूटच्या संचालक शिवानी दाणी-वखरे, आशुतोष वखरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
भारताचे भविष्य आणि भविष्यातील भारत या विषयावर मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आगामी १५ वर्षे भारतासाठी अत्यंत महत्वाची असून भारतातील युवा शक्ती, बदलणारी करदायीत्व असणारी कर पद्धती, पायाभूत सुविधांच्या उभारणीद्वारे गरिबांचा सर्वंकष विकास याआधारे भारताची अर्थव्यवस्था १० ट्रिलियनची होईल.
अर्थसंकल्पासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाद्वारे देशातील सर्वसामान्य जनतेला व सर्वच घटकांना मोठा दिलासा मिळाला असून हा अर्थसंकल्प नव्या भारताच्या उभारणीची पायाभरणीच आहे. सर्वसामान्य नागरिकांनी अर्थसंकल्प व याविषयीच्या सर्व संकल्पना सखोलपणे समजून घेतल्या पाहिजेत. याद्वारे अर्थविषयक सजगता वाढते. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये २०३० मध्ये देशाने कुठपर्यंत मजल गाठली असेल याचा सखोल विचार करण्यात आला असून उज्ज्वल भारताच्या भविष्याचा हा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या योजना मागील चार वर्षांच्या परिश्रमाचे फलित आहे. शेतकऱ्यांसाठी दूरगामी निर्णय घेण्यात आले असून दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी ७५ हजार करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी याचा शाश्वतपणे उपयोग होणार आहे. स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार शेतकऱ्यांसाठी विविध हितकारक निर्णय घेण्यात येत असून राज्यात तीन वर्षात साडेआठ हजार करोड रुपयांच्या शेतमालाची खरेदी करण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील अन्य तरतूदींबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मध्यमवर्गीयांसाठी आयकरामधील सूट हा मोठा दिलासा आहे. कामगारांसाठी पेंशन योजना महत्वपूर्ण असून भटक्या जमातींसाठी सामाजिक सुरक्षा उभारण्यात येत आहे.
देशाच्या आर्थिक वाटचालीबाबत फडणवीस म्हणाले, सर्वसामान्य गरिबांचा विकास म्हणजेच देशाचा सर्वंकष विकास हे सूत्र ध्यानात घेऊन आर्थिक समावेशनाद्वारे जास्तीत जास्त देशवासियांना जनधन खात्यांद्वारे बँकींगशी जोडण्यात यश मिळाले आहे. आता ३० करोड भारतीयांना डीबीटीद्वारे योजनांचा लाभ मिळत आहे. हे यातील पारदर्शकतेमुळेच शक्य झाले आहे. लोकांचे जीवनमान उंचावले पाहिजे, पायाभूत सुविधांद्वारे जनसामान्यांना फायदा झाला पाहिजे. यावर भर देण्यात येत आहे. स्वच्छतागृहांची व आवास योजनेतील घरांची बांधणी याद्वारेही मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली असून यातूनही ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळाली. २१ व्या शतकातील भारत हा कर भरणाऱ्या, करदायित्व जपणाऱ्या नागरिकांतूनच उभा राहणार आहे. जीएसटी करपद्धतीमुळे क्रांतीकारक बदल झाले असून यातून गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर कमी झाले असून करचुकवेगिरीही कमी झाली आहे. १ लाख १५ हजार करोड रुपये जीएसटीमुळे प्राप्त झाले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
आता चौथी औद्योगिक क्रांती येऊ घातली असून यामध्ये आर्टीफिशियल इंटिलीजन्स महत्वपूर्ण ठरणार आहे. आता सेवाक्षेत्राचे योगदान मोठे राहणार असून याद्वारेही रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होणार आहे. स्टार्टअपमध्येही रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असून या सर्वसंधी देशवासियांनी समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बीएसईचे सी वासुदेवन म्हणाले, बीएसईद्वारे गुंतवणूकदारांच्या अर्थसाक्षरतेवर भर देण्यात येतो. आर्थिक गुंतवूणुकीविषयी सर्वसामान्यांना माहिती देण्यात येते. शेअरबाजारातील घडामोडी व म्युच्युअल फंड याबाबतही जागृती करण्यात येते. शेअर बाजारातील व्यवहार आता पूर्वीपेक्षा खूपच पारदर्शक झाले असून गुंतवूणकदारही आता सजग होत आहेत. आर्थिक गैरव्यवहारांविरोधात कडक कारवाई करण्यात येत असल्याचेही वासुदेवन यांनी सांगितले.
प्रस्तावाना शिवानी दाणी-वखरे यांनी केली. तर सूत्रसंचालन सई देशपांडे यांनी केले.
आशुतोष वखरे व विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पातील तरतूदी विषद करीत त्याबाबत माहिती दिली.  Print


News - Nagpur | Posted : 2019-02-02


Related Photos