क्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात बैठक घ्यावी : जिल्हाधिकारी


-लोकशाही पंधरवाडा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा  :
कोणत्याही निवडणूकित  प्रिसायडिंग ऑफिसर आणि झोनल ऑफिसर ची भूमिका महत्त्वाची असते. मतदानाच्या दिवशी मतदार यादीत नाव नाही म्हणून मतदारांची ओरड होते. यासाठी मतदानाच्यादिवशी लोकांच्या तक्रारी कमी होऊन मतदान शांततेत पार पडावे म्हणून  झोनल ऑफिसरने आतापासूनच  त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक गावात भेट देऊन मतदान केंद्र स्तरीय अधिकारी, मतदार आणि गावातील लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन मतदानाविषयी जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्यात.
२६ जानेवारी ते १० फेब्रुवारी हा लोकशाही पंधरवाडा साजरा होत असताना निवडणूक प्रक्रितेत सहभागी असणाऱ्या क्षेत्र अधिकारी  व मतदान केंद्र प्रमुख यांना त्यांच्या कामाबद्दल जाणीव करून देण्यासाठी विकास भवन येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याबैठकीला  उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, प्रकाश शर्मा, चंद्रकांत खंडाईत उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.
निवडणुकीत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवित आहे. तसेच निष्पक्ष व पारदर्शी निवडणुका होण्यासाठी आणि मतदाराला त्याने दिलेले मत त्याच्या आवडत्या उमेदवाराला पडले आहे याची खात्री होण्यासाठी  इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासोबत यावर्षी व्ही व्ही पॅट यंत्र यंत्र असणार आहे. हे यंत्र अतिशय नाजूक असून याला स्वतःच्या मुला प्रमाणे हाताळावे. तसेच ई व्ही एम किंवा व्ही व्ही पॅट मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची माहिती तात्काळ क्षेत्र अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱयांना द्यावी. त्यामध्ये स्थानिक स्तरावर कोणतीही  दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नये असेही  नवाल यांनी यावेळी सांगितले.
 क्षेत्र अधिकारी आणि मतदान केंद्र अधिकारी यांनी मतदान यंत्र आणि मतदान प्रक्रियेविषयी सर्व माहिती प्रशिक्षण कार्यशाळेतून समजून घ्यावी. मतदार यादीत नाव आहे पण फोटो नाहीत अशा मतदारांचे फोटो क्षेत्र अधिकारी यांनी मतदान केंद्र अधिकारी यांच्या कडून जमा करावेत आणि यादीला जोडावेत. ३१ जानेवारीला मतदार यादी प्रसिद्ध झाली असून मतदारांनी त्यांचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री करण्यास सांगावे. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती मिळू शकते. याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नाव नसल्यास अजूनही मतदारांना १० दिवसाच्या आत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करण्यास सांगावे. त्यामुळे ऐनवेळी होणाऱ्या तक्रारी कमी होऊन मतदान शांततेत पार पडेल. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने Cvigil  हे अँप तयार केले असून निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास नागरिक या अँप च्या माध्यमातून तक्रार करू शकतात. याबद्दल सुद्धा नागरिकांना माहिती द्यावी असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
महिला  बचत गटांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यासाठी आज ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील क्लस्टर समन्वयकांची बैठक सुद्धा घेण्यात आली. उमेद आणि मविम च्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचत गटाचे मोठे संघटन उभे राहिले आहे. निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी  निवडणूक पाठशाळा घेण्यात येणार आहे. यामध्ये महिलांना मतदार यादीत नाव नोंदणी करणे आणि प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही आमिषाशिवाय मतदान, निष्पक्ष व पारदर्शी वातावरण निर्मितीसाठी आणि गावात मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी या महिलांची मदत होणार आहे. त्यासाठी आज जिल्हाधिकारी यांनी संबंधित समन्वयकाना गावात भेट देऊन बचत गटाच्या महिलांची बैठक घेण्याच्या सूचना दिल्यात. यासाठी आवश्यक ते जनजागृतीपर  साहित्य निवडणूक शाखेतून उपलब्ध जरून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.  Print


News - Wardha | Posted : 2019-02-01


Related Photos