पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार


वृत्तसंस्था / पुणे :   विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ६ अंशांची घट झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट आहे. पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. दररोज तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होत असतानाही थंडी कायम आहे. गुरुवारी विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट होती. कमाल तापमानात घट झाल्याने विदर्भात तुरळक ठिकाणी दिवसाही गारठा होता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागातील किमान तापमानात लक्षणीय घट नोंदली गेली. राज्याची उपराजधानी नागपूर येथे गुरुवारी राज्यातील नीचांकी ६.३ अंश तापमानाची नोंद झाली. कोकण विभागातील मुंबई, अलिबाग, रत्नागिरी येथे तापमान सरासरीच्या आसपास आहे. मध्य महाराष्ट्रातील पुण्यात १०.१, जळगावमध्ये ७.०, तर महाबळेश्वर येथे १२.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ात औरंगाबाद येथे ९.९ अंश किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भात नागपूरसह, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ आदी भागात तापमानाचा पारा ७ ते १० अंशांवर असल्याने येथे थंडीचा कडाका अधिक आहे.  हवामान विभागाच्या परिमाणानुसार किमान तापमान १० अंशांपेक्षा कमी आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांपर्यंत घट झाल्यास तो दिवस ‘थंड दिवस’ ठरतो. कमाल तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाली असेल, तर तो दिवस ‘अतिथंड दिवस’ठरतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गोंदिया, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, परभणी येथे थंड दिवसाची नोंद झाली.  Print


News - Rajy | Posted : 2019-02-01


Related Photos