ना. राजे अम्‍ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मलेझरी येथील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न


-छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन तरुणाईने जीवनमार्ग ठरवायला हवा - पालकमंत्री 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
आदिवासी विकास व वने तथा गडचिरोली जिल्हा पालकमंत्री राजे अम्‍ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मूलचेरा तालुक्यातील मलेझरी येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम तथा क्रीडा प्रसारक मंडळ यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा ३० जानेवारी रोजी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व शिवाजी महाराजांवरिल नाट्य प्रयोगाने उपस्थित तमाम जनतेसोबतच मंत्रीमहोदयही मंत्रमुग्ध झाले.
ना. राजे अम्‍ब्रीशराव आत्राम उपस्थितांशी संवाद साधतांना म्हणाले, शिवाजी महाराज हे आजच्या युवा पिढीचे खऱ्या अर्थाने आदर्श व मार्गदर्शक असायला हवे. त्यांचा आदर्श ठेऊन समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी तरुणाईने कार्यमग्न राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबां पासून प्रेरणा घेऊन तरुणांनी उच्चशिक्षित होऊन सामाजिक प्रगतीसाठी हातभार लावणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकांनीही मुलांवर तशा पद्धतीचे संस्कार करणे अगत्याचे आहे. तरच आदर्श समाज व्यवस्था प्रस्थापित होणे शक्य आहे. येणाऱ्या पिढीला सुसंस्कारीत करणे हेच प्रगतिशील भारत देश घडविण्याचे एकमेव प्रभावी साधन आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासोबतच सुराज्य निर्माण केले. आपल्याकडे पूर्वजांच्या आशीर्वादाने स्वराज्य आहे त्याचे सुराज्यात रूपांतरण करणे ही आज सर्वार्थाने आपली जबाबदारी आहे. 
स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात बोलतांना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्याचा पालक या नात्याने आपल्याला भेडसावणाऱ्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे, असे मी मानतो. आणि त्यासाठी कार्यरत राहण्याला मी प्रथम प्राधान्य देत असतो. पण आपल्या सर्वांचा सहभाग हाही त्यात महत्वाचा आहे. कारण आपल्या सहभागातूनच मलाही जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल. तरुणांच्या शरीर, मन, बुद्धी आदींचा सर्वांगीण विकास होण्याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत  परिसरात एक वाचनालय, खेळाचे मैदान, आणि ध्यानधारणा केंद्र उभारण्याचा माझा मानस आहे. यासाठी आपल्या सर्वांची साथ मला हवी आहे. मैदान किंवा वाचनालय यांच्या करिता जागेच्या तरतुदी संदर्भात कुठलीही अडचण असल्यास मला कळवा. आपण त्यावर तोडगा नक्की काढू. खुपश्या ठिकाणी वाचनालये सुरू झालेली आहेत. पण काही ठिकाणी मंजुरी देऊनही कामे प्रलंबित आहेत. तीही कामे लवकरच मार्गी लागेल. अश्याप्रकारे क्षेत्राच्या विकासासाठी जे काही लागेल, यात निधी असो अथवा प्रशासकीय अडचणी किंवा इतर काही या सर्व समस्यांचे निराकरण करून क्षेत्राच्या विकासासाठी मी सदैव प्रयत्नरत आहे, अश्याप्रकारे संवादातून पालकमंत्र्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
पालकमंत्र्यांच्या कार्यशैली संदर्भात बोलतांना प्रकाश गेडाम म्हणाले, गडचिरोली जिल्हा जेव्हापासून अस्तित्वात आला तेव्हापासून जेवढी विकासकामे झाली नाही त्याच्या कितीतरी जास्त प्रमाणात विकासकामे मागच्या ४ वर्षांच्या कार्यकाळात मंत्रीमहोदयांच्या पुढाकाराने करण्यात आली आहेत. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने १५ हजार कोटींपेक्षा जास्त निधी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमार्फत रस्ते बांधकामकरिता आणण्यात आला आहे. आदिवासींच्या रोजगारासाठी चेण्णा प्रकल्प काही दिवसांतच सुरू करण्यात येईल. २५ हजार आदिवासी मुलांना शिक्षण, आदिवासी मुलांना जर आश्रमशाळेत प्रवेश मिळाला नाही तर महिना ५ हजार शासनाकडून देण्याची तरतूद, आदिवासींना बजेट मध्ये ९ टक्के वाटा, आदी विविध प्रकारची महत्वपूर्ण विकासकामे मा. पालकमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात केलेली आहेत. मंत्रीमहोदयांच्या पुढाकाराने आलेल्या कामाचं भूमिपूजन करून विरोधक श्रेय घेत आहेत आणि त्यांचे नाव घेऊन अपप्रचार करत आहेत. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. अशी आशा व्यक्त करत गेडाम यांनी पालकमंत्र्यांच्या कामांचा अल्पसा परिचय करून दिला.
यावेळी जि. प. समाजकल्याण सभापती माधुरीताई उरेते, भाजपा विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रकाश गेडाम, अहेरी न. पं. अध्यक्षा हर्षाताई ठाकरे, भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, सरपंच रुपाली निमसरकार, उप सरपंच विद्याधर सांगडे, हेमंत उराडे, ग्रा. पं. सदस्य विजू मंदाडे, विनोद झाडे, मनोहर बामनकर, बैनाबाई मडावी, मुख्याध्यापक किरण गोंधोळी, महादेव उरकुडे तसेच मलेझरी ग्रामस्थ व सम्पूर्ण तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-31


Related Photos