महत्वाच्या बातम्या

 बँकांनीही नोटबंदीचा धसका घेतला : २ हजार च्या नोटा स्वीकारण्यास नकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : दोन हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केल्यानंतर राज्यात शनिवारी अचानक व्यवहारात या नोटांची चलती दिसली.

नागपूर, छत्रपती संभाजी नगर, पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये किराणा दुकान, भाजीपाला, पेट्रोलपंप याशिवाय ठोक व्यवहारात दोन हजारांच्या नोटा खर्ची घालण्यास नागरिकांनी प्राधान्य दिल्याचे चित्र दिसले. काही ठिकाणी नोटा स्वीकारण्यास नकार देण्यात आला. व्यवहारात अचानक २ हजार च्या नोटा वाढल्याने सुटे पैसे देण्याचा प्रश्न निर्माण झाला. नोटा बँकेत जमा करण्यासाठी नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत या नोटा चलनात असतील. मात्र, काही बँकांनी आताच या नोटा स्वीकारणार नसल्याचे फलक लावले आहेत.

छ. संभाजीनगरमध्ये नागरिकांनी दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी सकाळीच बँकांसमोर रांगा लावल्या. सोमवारनंतर बँकेत नागरिकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने काही बँकांनी नियोजन केले आहे.

जळगाव जिल्हा बँकेत नोटा स्वीकारणे बंद

अमळनेर (जि. जळगाव) : जळगाव जिल्हा बँक शाखेत दोन हजारांच्या नोटा सोमवारपासून स्वीकारू नयेत, असे आदेश वरिष्ठांडून आले आहेत. ग्राहकांनी बँकेत भरणा केला मात्र दुपारी अचानक सूचना आल्या की, सोमवारपासून या नोटा स्वीकारू नयेत.

शनिवारी दुपारपासूनच नोटा घेणे बंद करण्यात आले. जिल्हा बँकेकडील दोन हजारांच्या नोटा जळगाव व पारोळा येथील स्टेट बँक शाखा तसेच जळगावच्या आयसीआयसीआय बँकेने स्वीकारल्या नाहीत, याविषयी आपण संबंधितांशी बोललो. तेव्हा उद्धटपणे उत्तरे देण्यात आली. याविषयी रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करणार आहोत, असे जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख म्हणाले.

नोटा दानपेटीत टाकू नयेत : शिर्डी संस्थान

शिर्डी जुन्या पाचशे व हजाराच्या सुमारे साडेतीन कोटीच्या नोटा अद्यापही साई संस्थानच्या तिजोरीत पडून आहेत. आता दोन हजारांची नोटांच्या पार्श्वभूमीवर साई संस्थान सतर्क झाले आहे.

३० सप्टेंबरनंतर भाविकांनी दोन हजाराच्या नोटा दानपेटीत टाकू नयेत. असे आवाहन संस्थानचे सीईओ पी. शिवाशंकर यांनी केले आहे. पडून असलेल्या जुन्या नोटांबाबत रिझर्व्ह बँकेकडे वारंवार पत्रव्यवहार करनही नोटा बदलून मिळाल्या नाहीत. अहमदनगरच्या जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्यालयातही १२ कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

नोटा बदलून घेण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन बँक अधिकाऱ्यांनी केले.





  Print






News - Rajy




Related Photos