शासकीय योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे : एम.बी.दुधे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
प्रत्येक नागरिकांना कायदयाची माहिती व्हावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होवू नये व ते आपल्या न्यायापासून वंचित राहू नये तसेच त्यांना कायदयाचे संरक्षण मिळावे यासाठी कायदयाची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव एम.बी.दुधे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया व ग्रामपंचायत कारंजा यांचे संयुक्त वतीने ग्रामपंचायत कारंजा येथे २३ जानेवारी रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ॲड.आर.जी.रॉय, ॲड.अर्चना नंदघळे, ॲड.प्रणिता कुलकर्णी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
‘मृत्यूपत्राचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन करतांना ॲड.रॉय यांनी स्वत:च्या खाजगी मालकीतून कमावलेल्या जमीन, संपत्ती इत्यादी वस्तूवर कुटूंबातील १८ वर्षावरील व्यक्तीचा समान अधिकाराचा वापर आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटूंबातील व्यक्तींना होतो असे त्यांनी सांगितले. ‘तृतीयपंथीयांचे अधिकार’ या विषयावर बोलतांना ॲड.नंदघळे यांनी सांगितले की, भारतात अंदाजे २००००० च्यावर तृतीयपंथीय आहेत. त्यांना जगण्याचा अधिकार आहे, सामान्य नागरिकांसारखे समान अधिकार भारतीय राज्यघटनेने त्यांनाही दिले आहेत. आपले मुलभूत हक्क प्राप्त करुन घेण्याचा त्यांनाही अधिकार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण’ या विषयावर बोलतांना ॲड.कुलकर्णी म्हणाल्या, भारतीय संविधानाच्या कलम १४ अन्वये महिलांना भेदभावापासून मुक्ती, कलम १५ अन्वये स्त्री-पुरुष समानता आणि कलम २१ अन्वये जिविताचे व स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे, हा व्यापक हेतू डोळ्यासमोर ठेवून महिलांनी कौटूंबिक अत्याचाराला बळी पडू नये. समाजामध्ये कौटूंबिक हिंसाचार घडू नये म्हणून केंद्र शासनाने कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ व नियम २००६ संपूर्ण भारतात २६ ऑक्टोबर २००६ पासून लागू केला आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास ग्रामपंचायत कारंजा येथील सरपंच धनवंता उपराडे, उपसरपंच महेंद्र शहारे, ग्रामविकास अधिकारी पी.सी.मेश्राम, पं.स.सदस्य योगराज उपराडे, तंटामुक्ती अध्यक्ष मिताराम हरडे, पोलीस पाटील अलका रंगारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लिखीराम बन्नाटे यांनी केले. उपस्थितांचे आभार महेंद्र शहारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.जी.बोरीकर, पी.एन.गजभिये, गुरुदयाल जैतवार व नोकचंद कापसे यांनी सहकार्य केले.



  Print






News - Gondia | Posted : 2019-01-31






Related Photos