गडचिरोली पोलिस विभाग, मैत्री परिवार संस्थेच्या पुढाकाराने ३ फेब्रुवारीला आलापल्लीत ५४ आदिवासी जोडपी होणार विवाहबध्द


- ५ आत्मसमर्पीत नक्षल जोडप्यांचाही समावेश
- पत्रकार परिषदेतून दिली माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: पोलिस अधीक्षक कार्यालय, मैत्री परिवार संस्था नागपूर व साई भक्त सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ३ फेब्रुवारी रोजी भव्य सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले असून या सामुहिक विवाह सोहळ्यात ५४ आदिवासी जोडपी विवाहबध्द होणार आहेत. यामध्ये पाच आत्मसमर्पीत नक्षल जोडप्यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. सदर विवाह सोहळा आलापल्ली येथील क्रीडा संकुलात ३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता आयोजित केला आहे.
पत्रकार परिषदेला अपर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, मैत्री परिवार संस्थेचे प्रा. प्रमोद पेंडके उपस्थित होते.
गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने जिल्ह्यातील आदिवासी जनतेसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून भव्य सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरीक आर्थिक परिस्थितीअभावी आपल्या मुला - मुलींचे विवाह मोठ्या थाटात पार पाडू शकत नाहीत. यामुळे त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी पोलिस विभाग, मैत्री परिवार संस्थेच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पोलिस विभागाच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण विवाह समिती, कार्यालयीन समिती, भोजन समिती, स्वागत समिती, विवाह समिती, निवास समिती, निवास यातायात समिती, स्वच्छता समिती, आरोग्य व्यवस्था समिती, लाईट, मंडप व ध्वनी, लाॅन, स्टेज समिती, फोटो, व्हिडीओ शुटींग समिती, मिडीया समिती, पार्कींग व्यवस्था व सुरक्षा व्यवस्था समिती या समित्यांना आपआपली जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 
आदिवासी समाजाच्या रितीरिवाजानुसार आदिवासी परंपरा कायम ठेवत, वाजत गाजत थाटात मिरवणूक काढून मंगलाष्टकांसह प्रफुल्लीत वातावरणात हा विवाह सोहळा पार पडणार आहेत. सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द होत असलेल्या जोडप्यांना आदिवासी विकास विभागाच्या कन्यादान योजनेमार्फत आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी पोलिस दलातर्फे पाठपुरावा करण्यात येणार आहे. गडचिरोलीतील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरीकांनी तयार केलेल्या विविध हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टाॅल लावण्यात येणार  आहे. विवाह सोहळ्यासाठी उपस्थित  राहणाऱ्या वधू - वरांच्या नातेवाईकांसाठी चहा, नाश्ता व जेवनाची व्यवस्था केली जाणार आहे. मागील वर्षी सामुहिक विवाह सोहळा गडचिरोली पोलिस दलाच्या नागरी कृती दलामार्फत पार पडला होता. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलिस दल, मैत्री परिवार संस्था हे या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-31


Related Photos