भंडाऱ्यात रेती तस्करांचा एसडीओंच्या पथकावर हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पवनी :
कारवाईसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (एसडीओ) पथकावर रेती तस्करांनी हल्ला केल्याची घटना पवनी तालुक्यातील बेटाळा येथे बुधवारी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास घडली. यात एसडीओ जखमी झाले असून त्यांच्या वाहनाच्या काचाही फोडण्यात आल्या. पवनी ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्याकडे रेती तस्करीच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरुन बुधवारी पहाटे ते तलाठी, पोलीस कर्मचारी असलेल्या पथकासह पवनी निलज रस्त्यावर वाहनाने गेले. पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास रेतीचे चार-पाच टिप्पर एकापाठोपाठ येताना दिसले. टिप्परला थांबविण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अंतरावर बेटाळाजवळ टिप्पर अडविला. काही कळायच्या आता १५ ते २० तस्करांनी हातात काठ्या व दगड घेऊन हल्ला केला. यात उपविभागीय अधिकारी राठोड जखमी झाले. तर वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.
या प्रकाराची माहिती पवनी पोलिसांना देण्यात. पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तस्कर पसार झाले होते. त्यानंतर पवनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्यात आली. एसडीओंना पवनीच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
लाखनी तालुक्याच्या पालांदूर परिसरात दोन दिवसापूर्वी तहसीलदारांच्या पथकांवर रेती तस्कारांनी लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दोन तस्करांना अटकही करण्यात आली. आता थेट एसडीओंच्या पथकावर हल्ला करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2022-04-27
Related Photos