महत्वाच्या बातम्या

 नागपूर : उन्हाळी परीक्षेत कॉपी रोखण्यावर विद्यापीठाचा भर 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची उन्हाळी २०२३ परीक्षा सोमवार २२ मे पासून सुरू होत आहे. उन्हाळी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा विभागाच्या वतीने भरारी पथकांचे गठन केले आहे. अधिष्ठाता यांच्या नेतृत्वात ही भरारी पथके विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये गैरप्रकार होऊ नये म्हणून दक्षता घेणार आहे.


या भरारी पथकातील सदस्यांची कार्यशाळा परीक्षा विभागातील सभागृहामध्ये पार पडली. यावेळी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे, सहअधिष्ठाता डॉ. श्याम कोरेटी, डॉ. प्रकाश ईटणकर आदी उपस्थित होते.


यावेळी भरारी पथकातील सदस्यांना मार्गदर्शन करताना परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी मागील परीक्षेतील विद्यार्थी, परीक्षा केंद्र तसेच गैरप्रकाराच्या प्रकरणांबाबत माहिती दिली. मागील परीक्षेत एकूण ३०१ प्रकरणे आढळून आली. यातील ७० प्रकरण एकाच केंद्रावरील असल्याचे त्यांनी सांगितले. विविध केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी परीक्षा विभागाकडे प्राप्त होतात. त्यामुळे उन्हाळी २०२३ परीक्षेत भरारी पथकांनी असे गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीमध्ये सर्व अधिष्ठातांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. शिवाय विविध समस्या, अडचणी तसेच भरारी पथकाच्या कार्य पद्धतीबाबत चर्चा करण्यात आली. परीक्षा विभागात झालेल्या या बैठकीला भरारी पथकातील ७० ते ८० सदस्य उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos