३ हजारांची लाच स्वीकारल्यावरून पोलिस शिपाई आणि खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
चोरीच्या गुन्ह्यातून बाहेर काढल्याचे सांगून ३ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस शिपायासह एक खाजगी इसम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. भुमेश्वर देबीलाल येरणे (३४) असे पोलिस शिपायाचे नाव असून तो आमगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. तर नितीन ईश्वरदास तिरपुडे (३४) असे खाजगी इसमाचे नाव आहे.
तक्रारदार  आमगाव तालुक्यातील दहेगाव येथील रहिवासी असून मजूरीचे काम करतो. मागील दोन महिन्यांपूर्वी दहेगाव येथील शेतातून मोटारपंपाची चोरी झाली होती. चोरीच्या गुन्ह्यात दोघांना आमगाव पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  विचारपूस केल्यानंतर दोघांनाही सोडून देण्यात आले होते. यानंतर पोलिस शिपाई भुमेश्वर येरणे याने तक्रारदाराच्या घरी जावून चोरीच्या गुन्ह्यातून काढल्याचे सांगून ३ हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रारीवरून सापळा रचण्यात आला. पोलिस शिपाई येरणे याने खाजगी इसम नितीन ईश्वरदास तिरपुडे रा. मानेगाव याच्या मार्फत लाच स्वीकारली. याप्रकरणी आमगाव पोलिस ठाण्यात कलम ७ (अ) १२ लाचलुचपत प्रतिबंधक १९८८ (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 
सदर कारवाई पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक (अतिरिक्त कार्यभार) श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस हवालदार राजेश शेंद्रे, नापोशि रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, चालक नापोशि देवानंद मारबते यांनी केली आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2019-01-30


Related Photos