जागतिक कर्करोग दिन मोहिमेचा शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
जागतिक कर्करोग दिन हा दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कर्करोगास लढा देण्यासाठी २१ जानेवारीपासून ते ४ फेब्रुवारी २०१९ पर्यंत उपक्रम साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत २१ जानेवारीला सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भिसे होत्या. यावेळी दंत चिकित्सक डॉ.ममता सरोते, डॉ.कविता मदान, डॉ.शैलेश कुकडे व श्रीमती सपाटे उपस्थित होते.
यावेळी डॉ.भिसे म्हणाल्या, या मोहिमेचा मुख्य उद्देश कर्करोगाचे जागतिक ओझे कमी करण्यासाठी एकत्रित आणि वैयक्तीकरित्या कर्करोगाशी लढा देण्यासाठी त्याबद्दल जनजागृती करुन लोकांचे जीवनमान सुधारणे आहे असे सांगितले. डॉ.राऊत म्हणाले, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवनामुळे कॅन्सरचे प्रमाण फार वाढत चालले आहे.
यामुळे रुग्णांना समुपदेशनाची गरज आहे. त्याकरीता समाजामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून जनजागृती करुन कॅन्सर व कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल. लोकांना या मोहिमेअंतर्गत होणाऱ्या आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये तपासणी करुन जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ.कुकडे यांनी सुध्दा उपस्थितांना कर्करोगाविषयी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.स्नेहा वंजारी यांनी केले. उपस्थितांचे आभार सुरेखा आझाद यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संध्या शंभरकर, विवेकानंद कोरे, जुबेर इनामदार व तार्केश उके यांनी सहकार्य केले.

   Print


News - Gondia | Posted : 2019-01-30


Related Photos