कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून या एकाकी पदांना वगळून सिंचन सहाय्यक पद निर्मिती करा


- महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटनेची मागणी
- पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन
- ४ फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पाटबंधारे विभागातील कालवा निरीक्षक, मोजणीदार व दप्तर कारकून या एकाकी पदांना वगळून सिंचन सहाय्यक पद निर्मिती करण्यात यावी, सहावा वेतन २४०० ग्रेड पे प्रमाणे देण्याची शिफारस करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट राज्य सिंचन कर्मचारी संघटना गडचिरोली च्या वतीने गडचिरोली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या मागण्यांसाठी ४ फेब्रुवारीपासून  मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत संप व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. 
निवेदनात म्हटले आहे की, कालवा निरीक्षक, मोजणीदार व दप्तर कारकून या पदांची वेतनश्रेणी समकक्ष पदांपेक्षा फारच अत्यल्प आहे. त्यामुळे मागील २० वर्षांपासून संघटना वेतन त्रुटी सुधारणा करून झालेला अन्याय दूर करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करीत आहे. या तिन्ही पदांचे सुसूत्रीकरण करून एकच सिंचन सहाय्यक संवर्ग निर्माण करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने २८ ऑक्टोबर २००९ रोजी घेतला आहे. याबाबत राज्यस्तरीय संघटनेने अनेकदा निवेदने दिलेली आहेत. आपल्या खात्याने या संदर्भात राज्यस्तरीय संघटनेसोबत बैठका घेवून या पदाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविलेले आहे. संघटनेने केलेल्या मागण्या मान्य होवून तलाठी, ग्रामसेवक यांच्या प्रमाणे वरीष्ठ वेतनश्रेणी मिळेल, असे आश्वासनसुध्दा देण्यात आले.
यासंदर्भात वेतनश्रेणी सुधारणा समितीचे बक्षी यांच्यासमवेत २३ मे २०१८ रोजी सुनावणी झाली आहे. या ठिकाणी संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे की, शासनाचे कालवा निरीक्षक, मोजणीदार व दप्तर कारकून या तिनही पदांना एकाकी पदे संबोधल्यामुळे कशाप्रकारे अन्याय झालेला आहे. आमच्या समकक्ष पदांना वरीष्ठ वेतनश्रेणी दिलेली आहे. ती आमच्या पदांना मिळालेली नाही. यातील तफावत फार मोठे आर्थिक नुकसान करणारी आहे, हे दिसून येते.
सध्या सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. याममध्ये आमच्या पदांना सहाव्या वेतन आयोगातील २४०० ग्रेड वेतनानुसार वरीष्ठ वेतनश्रेणी देणे क्रमप्राप्त होते. असे असतानाही तो दिलेला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच यापुढेही होत राहील. 
पाटबंधारे विभागाने कालवा निरीक्षक, मोजणीदार व दप्तर कारकून ही पदे एकाकी संबोधल्यामुळे इतर खात्यातील समकक्ष पदांपेक्षा या पदांचे वेतन फारच अत्यल्प आहे. हा आर्थिकदृष्ट्या फारक बसत असल्यामुळे बहूतांशी कर्मचारी आपल्या खात्याची नोकरी सोडून इतर खात्यात गेले आहेत. एकाकी पदातून वगळून सहावा वेतन आयोगातील ग्रेड पे २४०० मिळावे व त्या समकक्ष वेतनश्रेणी मिळविण्याकरीता महाराष्ट्र राज्य सिंचन कर्मचारी संघटना येत्या ४ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार तसेच धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे एकाकी पदांना वगळून सिंचन सहाय्यक पद निर्माण करावे, सहाव्या वेतन आयोगातील ग्रेड पे तातडीने देण्यात यावे अशी मागणी, निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना डी.पी. बर्लावार, एन. एस. ढोमणे, पी.एम. पेंदाम, एस.जी. कुसराम, पी. आर. नागोसे, एच.बी. ढोणे, व्ही.एस. साखरे, ए.एन. शेख, के.इ. उईके यांच्यासह इतर सर्व कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून उपस्थित होते.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-01-30






Related Photos