खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांकडून आणखी एकाची हत्या : भामरागड तालुक्यातील घटना


- नक्षल्यांकडून आठवड्याभरात ५ जणांची हत्या 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड : 
जिल्ह्यात नक्षल्यांकडून हत्यासत्र सुरुच असून आज पुन्हा एका निरपराध आदिवासी नागरिकाची पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन हत्या करण्यात आली. ही घटना भामरागड  तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या पेनगुंडा फाट्यावर आज सकाळी उघडकीस आली . वाले वंजा कुडयामी (वय ५०) असे हत्या करण्यात आलेल्या आदिवासीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वाले वंजा कुडयामी याचा सात दिवसा आधीच नक्षल्यांनी अपहरण केला होता . पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन त्याची हत्या करून त्याचा मृतदेह तालुका मुख्यालयापासून २० किमी अंतरावर असलेल्या पेनगुंडा फाट्यावर ठेवण्यात आला . सोबतच त्याच्या देहावर नक्षली पत्रक सुद्धा ठेवण्यात आले आहे . तसेच ३१ जानेवारी पर्यंत शहिद सप्ताह पाळण्याचे आवाहन देखील नक्षल्यांनी केले आहे . 
यापूर्वी २२ जानेवारीला भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील तीन नागरिकांची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यांचे मृतदेह भामरागड-आल्लापल्ली मार्गावर फेकून दिले होते. दुसरी घटना एटापल्ली तालुक्यात उघडकीस आली आणि आज भामरागड तालुक्यात तिसरी घटना उघडकीस आली आहे . संपूर्ण आठवड्याभरात नक्षल्यांनी ५ निष्पापांचा बळी घेतला आहे . त्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात दहशत निर्माण झाली आहे . 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-30


Related Photos