राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या कार्यकारिणीवर डॉ. अभय बंग यांची नेमणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे डॉ. अभय बंग यांची नेमणूक राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या कार्यकारिणीवर केली आहे. 
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाचे बहुतेक कार्यक्रम हे राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन अंतर्गत कार्यान्वयित होतात. या मिशनचे वार्षिक बजेट तीस हजार कोटी रुपये असून त्यातून ग्रामीण व शहरी आरोग्यसेवेसाठी सर्व राज्यांना कार्यक्रम व बजेट दिले जाते. माता व बालआरोग्य, कुटुंब कल्याण, संक्रामक रोग नियंत्रण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालये ही सर्व या अंतर्गत संचालित केली जातात.
राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या संचालन समितीवर डॉ. राणी बंग यांची तज्ञ म्हणून पूर्वीच नेमणूक झाली असून या मिशनच्या कार्यकारिणीवर तज्ञ सदस्य म्हणून डॉ. अभय बंग यांना नेमण्यात आले आहे. मेडिसीन व सार्वजनिक आरोग्य या दोन विषयात उच्चशिक्षण घेतलेले डॉ. अभय बंग हे ‘सर्च’ या
स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत. ‘सर्च’ संस्था गेली बत्तीस वर्षे गडचिरोली जिल्ह्यात ग्रामीण व आदिवासी भागात आरोग्यसेवा देत आहे. डॉ. बंग जोडप्याच्या नेतृत्वात सर्च ने आरोग्याचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी केलेले पथदर्शी संशोधन कार्य जगप्रसिद्ध असून महिला आरोग्य, बालमृत्यू, आदिवासी आरोग्य, असंसर्गजन्य रोग नियंत्रण, व्यसनमुक्ती या विविध विषयांवरील कार्याने राज्याच्या व देशाच्या आरोग्यनीतींवर आपला ठसा उमटवला आहे.
डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय तज्ञ समितीने नुकताच ‘भारतातील आदिवासींचे आरोग्य : स्थिती व मार्ग’ हा भारतातला पहिला अहवाल बनवून भारत सरकारला कृतीसाठी सादर केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दारू व तंबाखूचा प्रश्न व त्यावर ‘मुक्तिपथ’ हा जिल्हाव्यापी प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने डॉ. अभय बंग यांनी सुरू केला असून तो तीन जिल्ह्यात व्यापक करण्याचा निर्णय मुख्यमंत्री  देवेंद्र फडणीसांनी घेतला आहे. डॉ. अभय बंग हे पद्मश्री व महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी भूषित असून त्यांना दोन विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट प्रदान केलेली आहे.
                        . .      Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-29


Related Photos