महत्वाच्या बातम्या

 शहरात डी.जे. चा दणदणाट : मर्यादा पलीकडे आवाजामुळे नागरिक हैराण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून शहरात जिकडे तिकडे डी. जे. ची धूम ऐकायला मिळत आहे. चौकावर, रस्त्यावर आणि लॉन मध्ये मर्यादा पलीकडे गोंगाट करणाऱ्या डी. जे. मुळे शहरातील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. ध्वनी प्रदुषण बाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य शासनाचे पर्यावरण व ध्वनी प्रदुषण नियंत्रण कायद्याला दररोज पायदळी तुडविले जात असताना पोलिस विभाग कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.


अलीकडे तर हळदी, मेहंदी या उत्साह पर्वणींची भर पडल्याने एका दिवसाचा त्रास तीन दिवसांवर गेला आहे, तरी हा स्थानिक मुद्दा ठरून सहसा कुणी तक्रार करण्यास पुढे धजावत नाही. वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम आदी उत्साहात तर डी. जे. शिवाय तर होणारच नाही. कुणाच्या घरात हृदयरुग्ण अथवा बालक असल्यास विनंती, सूचना होतात. परंतु त्यादेखील कित्येवेळा वादाचे निमित्त ठरतात. डी. जे ध्वनिक्षेपक यांचा कानठळ्या बसवणारा दणदणाट मानसिक ताणासोबतच तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरत आहे.


ध्वनीप्रदूषण नियंत्रण व नियमन अधिनियम २००० नुसार डिजेसाठी डेसिबल मर्यादा ठरवून दिलेली आहे. दिवसा औद्योगिक परिसरासाठी ७५ डिसेबिल, व्यवसायिक परिसरासाठी ६५, रहिवासी परिसरासाठी ५५ व शांत परिसरासाठी ५० डेसिबल, रात्रीच्या वेळी औद्योगिक परिसरासाठी ७० डेसिबल, व्यवसायिक परिसरासाठी ५५, रहिवासी परिसरासाठी ४५ व शांत परिसरासाठी ४० डेसिबल मर्यादा घालून दिली होती, असे असताना डि जे च्या आवाज मोठ्या प्रमाणात असते. 


ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सन 2000 चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1983 चे कलम 15 प्रमाणे 5 वर्षापर्यंत कैद किंवा 1 लाखाचा दंड अथवा दोन्ही शिक्षाचे प्रावधान आहे. मात्र धार्मिक किंवा सामाजिक भावना दुखावल्या जाईल किंवा मंगल कार्यात विघ्न निर्माण होईल असे तर्क देऊन पोलिस विभाग संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई पासून हात झटकून घेताना दिसतात.
शहरात आणखी एक प्रथा सुरू झाली आहे, ते म्हणजे वाढदिवस निमित्त रात्री बारा वाजता फटाके फोडण्याची. रात्री शांतपणे झोपणारे नागरिक फटाक्याच्या आवाजामुळे खळबळून उठतात त्यात ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो.


ध्वनी प्रदूषणामुळे अनेक रोगांना आमंत्रण : 
आज आपल्याला आवाजाचे वेड लागले आहे. मोठ्या आवाजात आनंदोत्सव साजरा करणे हा आपला छंद झाला आहे. ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा, डोकेदुखी, चिडचिड, निद्रानाश, रक्तदाब, हार्टअटॅक होतो. पण काळजी कोण घेतो? अभ्यास करणारे विद्यार्थी, शांतपणे झोपणारे नागरिक यांचा यात काय दोष आहे?





  Print






News - Chandrapur




Related Photos