रक्तदान शिबिरांच्या आयोजनापूर्वी आणि नंतरही माहिती कळवण्याचे रक्तसंक्रमण समितीचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
राज्यातील अनेक रक्तपेढ्या रक्तसंकलनाचे काम योग्य प्रकारे करत नसून, रक्तसंकलन किती झाले, त्यातील किती रक्त वापरण्यात आले याची नीट माहितीही दिली जात नाही. त्यामुळे रक्तदान शिबिरांच्या आयोजनापूर्वी आणि नंतरही संबंधित माहिती कळवण्याचे निर्देश या रक्तपेढ्यांना राज्य रक्तसंक्रमण समितीने दिले आहेत. रक्तदान शिबिरांचे आयोजन न करणाऱ्या रक्तपेढ्यांनाही या निर्देशांमुळे रक्तसंकलनाचे काम जबाबदारीने करावे लागणार आहे. 
मे महिना आणि दिवाळी-नाताळसारख्या सुटीच्या काळात रक्तदान शिबिरांची संख्या कमी होते. त्यामुळे या कालावधीत रुग्णालयांमध्ये हमखास रक्ताची तूट आढळते. रक्तासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना वणवण करावी लागते. हा प्रकार टाळण्यासाठी राज्य रक्तसंक्रमण समितीने शिबिरांचे नियोजन योग्य रितीने करण्याचे निर्देश दिले होते. कोणत्याही राजकीय, सामाजिक संस्थेच्या इच्छेनुसार या शिबिरांचे आयोजन करण्यापेक्षा रक्तसंकलनाची एकूण गरज, त्यातील नियोजन व उपलब्धता हे निकष लक्षात घेणे गरजेचे असल्याचेही समितीने स्पष्ट केले होते. 
मुंबईतील काही रक्तपेढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन केले जाऊनही त्याचा योग्य प्रकारे वापर केला जात नाही. रक्त व रक्तातून विलग केलेल्या घटकांचा वापर ठरावीक दिवसांमध्ये केला नाही, तर ते रक्त वाया जाते. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असले, तरीही ते फेकून देण्याची वेळ येता कामा नये, असेही समितीने काही रक्तपेढ्यांना सांगितले आहे. राज्य रक्तसंक्रमण समितीच्या संकेतस्थळावर संकलित होणाऱ्या, वापर केल्या जाणाऱ्या रक्ताबरोबरच, उपलब्ध रक्ताची गरज यांविषयीची इत्थंभूत माहिती उपलब्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. मात्र, त्यालाही हवा तसा प्रतिसाद काही रक्तपेढ्यांकडून मिळत नाही.  
रक्तदान शिबिरांचे आय़ोजन करण्यापूर्वी संबंधित जागा शिबीर घेण्यायोग्य आहे का, हे पाहिले गेले पाहिजे. तसेच, त्याठिकाणी वैद्यकीय बाबींचे मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणेही गरजेचे असते. रक्तदान शिबिरांच्या ठिकाणांची माहिती राज्य रक्तसंक्रमण समितीला आधी कळवण्यात आल्यास त्याठिकाणी भेट देऊन आवश्यक बाबींची शहानिशा करणेही शक्य होणार आहे. रक्तसंकलनासाठी नियमित स्वरूपात शिबिरे न घेणाऱ्या रक्तपेढ्यांबाबतही निर्णय घेण्याचा अधिकार परिषदेला असणार आहे.   Print


News - Rajy | Posted : 2019-01-28


Related Photos