महत्वाच्या बातम्या

 सॉफ्ट सिग्नल नियम आयसीसीकडून रद्द : दिग्गज खेळाडूंनी उपस्थित केले होते प्रश्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : जेन्टलमेन्स गेम अशी ओळख असणाऱ्या क्रिकेटचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत. या नियमांना आयसीसीने मान्यता दिली आहे. पण, कधी कधी काही नियम खेळाडूंसाठी डोकेदुखी ठरतात आणि त्यावर आवाज उठवला जातो. यामुळेच आयसीसीला अनेकदा स्वतःचे नियम रद्द करावे लागले आहेत. सॉफ्ट सिग्नल हा असाच एक नियम आहे, ज्याने टीम इंडियासह जगातील अनेक क्रिकेटपटूंना हैराण केले आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसी सॉफ्ट सिग्नलचा नियम संपवणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भाग घेणारे हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जून ते ११ जून दरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यातून सॉफ्ट सिग्नल नियम क्रिकेटमध्ये दिसणार नाही. सॉफ्ट सिग्नल रद्द करण्यास आयसीसी क्रिकेट समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मंजुरी दिल्याचे मानले जात आहे.

अनेक क्रिकेटपटूंनी या नियमावर प्रश्न उपस्थित केल्याने आयसीसीला सॉफ्ट सिग्नल संपवण्याचा निर्णय घ्यावा लागला. अनेकदा टीम इंडिया देखील या नियमाचा बळी ठरली आहे. २०२१ साली हिंदुस्थान- इंग्लंड टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात सूर्यकुमार यादव या नियमाचा बळी ठरल्यानंतर पहिला सॉफ्ट सिग्नल वाद समोर आला.

सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय?

सॉफ्ट सिग्नल हा क्लोज कॅचशी संबंधित नियम आहे. म्हणजे जेव्हा मैदानावरील अंपायरला कॅचबद्दल खात्री नसते, तेव्हा तो तिसऱ्या अंपायरला तपासायला सांगतो. मात्र, त्याआधी मैदानावरील पंचाला आपला निर्णय द्यावा लागतो. सहकारी पंचांशी बोलून ते जो निर्णय देतात त्याला सॉफ्ट सिग्नल म्हणतात. या नियमात, मैदानावरील पंचाचा निर्णय तेव्हाच बदलतो जेव्हा त्यांच्याकडे भक्कम पुरावा असतो. सॉफ्ट सिग्नल नियमानुसार, मैदानावरील पंचाने घेतलेला निर्णय हा बहुतांशी तिसऱ्या पंचाचाच निर्णय असतो. त्यामुळेच या नियमाबाबत वाद सुरू होता.





  Print






News - Rajy




Related Photos