महत्वाच्या बातम्या

 धामणगाव रेल्वे येथील निकिता जाधव कोण होणार करोडपती च्या हॉट सीटवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / अमरावती : कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी हॉट सीटवर बसण्याचे, महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसून प्रश्नांची उत्तरे देण्याचे, या खेळातून आपले भाग्य उजळविण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. हनुमान टाऊन, धामणगाव रेल्वे येथील निकिता जाधव या विद्यार्थिनीचे स्वप्न कोण होणार करोडपती या मराठी कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. २९ मे २०२३ पासून रात्री ९:०० वाजता सोनी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम सुरू होत आहे. ३१ मे व १ जूनला प्रक्षेपित होणाऱ्या एपिसोडमध्ये निकिता जाधव ही हॉट सीटवर बसून कुठपर्यंत पोहोचते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

निकिता हिने आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे येथून बी.एस.सी. (मायक्रो बॉयलॉजी) पूर्ण केले आहे. सध्या ती नांदगाव पेठ जि. अमरावती येथे बी.एड. करत आहे. बी.एड. पूर्ण करून शिक्षिका होण्याचे तिचे स्वप्न आहे. तिचे वडील प्रदीपकुमार जाधव हे चांदूर रेल्वे तालुक्यात जि.प. पूर्व माध्यमिक शाळा, जळका जगताप येथे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना लेखनाचा छंद आहे. त्यांचे ग्रामीण जीवनानुभव महाराष्ट्र टाईम्समध्ये गाव गण गोत या सदरात प्रसिद्ध होत आहेत. आई वैशाली गृहिणी आहे. मोठी बहीण अंकिता स्वप्निल साळुंके उच्च शिक्षित असून सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या पुढे ध्येय असणे गरजेचे आहे. परिश्रम हीच यशाची गुरूकिल्ली आहे. या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी निकिताने अथक प्रयत्न केले. त्यात ती यशस्वी झाली. तिच्या या यशाचे कोण होणार करोडपती कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी कौतुक केले आहे. 

निकिता हॉट सीटवर बसून काय कामगिरी करते हे पाहण्यासाठी ३१ मे व १ जून २०२३ ला सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार करोडपती हा कार्यक्रम पाहण्यास विसरू नका.





  Print






News - Rajy




Related Photos