महत्वाच्या बातम्या

 वंदे भारतला ब्रेक : आता धावणार तेजस एक्स्प्रेस, कमी तिकीट भाड्यात होणार प्रवास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर-बिलासपूर आणि बिलासपूर-नागपूर रेल्वेमार्गावर सुसाट धावणाऱ्या हायटेक वंदे भारत एक्स्प्रेस ला ब्रेक लागला आहे. तिच्या बदल्यात आता रविवार,  १४ मेपासून या मार्गावर तेसज एक्स्प्रेस धावणार आहे.
या रेल्वे गाडीचा किराया वंदे भारतपेक्षा कमी राहणार आहे.


बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन नंबर २०८२५/ २०८२६ला तात्पुरत्या स्वरूपात बंद करून १४ मेपासून दुसरी एक्स्प्रेस तेजस रॅकसोबत चालविली जाणार आहे. तेजस रॅकमध्ये दोन एक्झिकेटिव्ह क्लास कोच, ७ चेअर कार कोच आणि २ पॉवर कारसह ११ कोच राहणार आहेत. ही व्यवस्था रविवार, १४ मेपासून सिकंदराबाद तिरुपती वंदे भारत एक्स्प्रेस २०७०१ / २०७०२चे रॅक प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
विशेष असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबरला नागपूर-बिलासपूर- नागपूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला नागपूर रेल्वेस्थानकावरून हिरवी झेंडी दाखविली होती. त्यावेळी आणि नंतरही विविध वैशिष्ट्यांनी नटलेल्या वंदे भारतचे मोठे काैतुक झाले होते.


प्रवासी घेऊ शकतात रिफंड :
बिलासपूर नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसचे जे प्रवासी या पर्यायी व्यवस्थेचा उपयोग करू इच्छित नाही. ते आपल्या प्रवास भाड्याची रक्कम कोणताही कॅन्सलेशन चार्ज शिवाय परत घेऊ शकतात. तर जे प्रवासी तेजस रॅकमध्ये प्रवास करतील, त्यांना संबंधित श्रेणीच्या तिकीट भाड्याची त्या अंतराची रक्कम टीटीई किंवा स्टेशन मॅनेजरकडून मिळालेल्या प्रमाणपत्राच्या आधारे नियोजित ठिकाणी प्रवास संपल्यानंतर ४८ तासांच्या आत परत घेऊ शकतात. ज्यांनी ऑनलाइन तिकीट केले अशांना प्रवास भाड्यातील रक्कम ऑनलाइन पद्धतीनेच परत मिळेल.


९५५ ऐवजी ८३० रुपये : 
विशेष म्हणजे, रिफंडची व्यवस्था रेल्वेस्थानकावरही केली जाणार आहे. या संबंधीची माहिती रेल्वेकडून रेल्वेस्थानकावर पब्लिक अनाउंसमेंट सिस्टम तसेच प्रवासात मेसेज द्वारे दिली जाणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे नागपूर ते बिलासपूर आणि बिलासपूर ते नागपूर प्रवास भाडे ९५५ रुपये आहे. तेजस एक्स्प्रेसचे प्रवास भाडे मात्र ८३० रुपयेच राहणार आहे. अर्थात प्रवाशांना १२५ रुपयांचा लाभ मिळणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos