गडचिरोलीत अल्पवयीन मुलींच्या दुचाकीने वनपालास उडविले, गंभीर जखमीस नागपूरला हलविले


- दुचाकीस्वार मुली नशेत असल्याची चर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
अल्पवयीन मुलींच्या भरधाव दुचाकीने एका व्यक्तीच्या दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वनपाल गंभीर जखमी झाल्याची घटना काल २३ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चामोर्शी मार्गावर घडली. अपघातात जखमी वर नागपूर येथील न्यूराॅन हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 
चामोर्शी मार्गाने भरधाव वेगाने येत असलेल्या दोन अल्पवयीन मुली कसल्यातरी नशेत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या मुलींनी एका दुचाकीस्वारास  धडक दिली. यावेळी नागरीकांनी घटनास्थळावर गर्दी केली. मात्र नशेत असलेल्या अल्पवयीन मुलींनी उपस्थितांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मुलींना तसेच जखमी वनपालास जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले. मात्र वनपाल  गंभीर जखमी असल्याने  नागपूर येथे हलविण्यात आले. सध्या प्रकृती गंभीर अयल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत गडचिरोली पोलिसांशी संपर्क साधला असता जखमी चे बयाण नोंदविल्यानंतर तपास केला जाईल अशी माहिती दिली आहे. 
गडचिरोली शहारतील शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले अल्पवयीन मुले - मुली शहरातील रस्त्यांवरून भरधाव दुचाकी दामटत असतात. तसेच शहराबाहेरील रस्त्यांवर गांजा तसेच इतर नशेच्या पदार्थांचे सेवन करीत असल्याचे आढळून येत आहेत. या कारणांमुळेच शहराबाहेरील सुनसान रस्त्यांवर अल्पवयीन मुला - मुलींची वर्दळ दिसून येत आहे. काही पालकांनी आपल्या पाल्यांना मागेल तेवढी रक्कम, दुचाकी देत आहेत. हट्ट पुरविण्याच्या नादात आपले मुले - मुली बाहेर काय करतात याला कुणीही महत्व देताना दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वीच पोटेगाव मार्गावर अल्पवयीन मुलांच्या दोन टोळक्यांमध्ये भांडण होताना आढळून आले होते. चांदाळा मार्गावरही विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेली मुले, मुली हुंदडतांना आढळून येतात. गटा - गटाने दुचाकी चालवून रस्त्यांवरून स्टंटबाजी करीत निष्पापांना अपघाताचे बळी करण्याचे प्रकार चालविले जात आहेत. या प्रकाराकडे पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेसच्या वेळाव्यतिरिक्त आपले पाल्य काय करतात, याकडेसुध्दा लक्ष देण्याची गरज आहे. असे होत नसल्यामुळेच दिवसेंदिवस अल्पवयीन मुला - मुलींच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी सुद्धा या प्रकाराकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-24


Related Photos