महत्वाच्या बातम्या

 आदिवासी समाजाने उद्योगाकडे वळावे : महाराष्ट्र इंडस्ट्रीचे अध्यक्ष गजाजन भलावी


-  आदिवासी उद्योजकता विकास कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : दुर्गम भागात राहणारा आदिवासी समाज सर्वत्र क्षेत्रात मागासलेला आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरु असून इतर क्षेत्राप्रमाणे आपल्याच उत्पादनावर आधारित उद्योग निर्मिती करण्यासाठी उद्योगाविषयी माहिती त्यांना देणे आवश्यक आहे. यासाठी ट्राबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून आदिवासी समाजातील युवकांना उद्योगाकडे वळता येईल, असे प्रतिपादन ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री महाराष्ट्रचे अध्यक्ष गजाजन भलावी यांनी येथे केले.
अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालय, ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री महाराष्ट्र आणि उद्योजक विकास यांच्या विशेष सहकार्याने शंकरनगर येथील साई सभागृहात आदिवासी उद्योजकता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार डॉ. देवराव होळी,अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मोहित गेडाम, सुजाता भोंगे, संस्कृती कुलकर्णी, तनवीर मिर्झा, श्रीकांत कुलकर्णी, प्रदीप खंडेलवाल, दिनेश ढोके,दिनेश केराम आदी यावेळी उपस्थित होते.
आर्थिक प्रगती शिवाय समाजाचा विकास होणार नाही, ही काळाची गरज आहे. नोकरी पेक्षा नोकरी देणारे बना, असे आवाहन श्री. भलावी यांनी केले. आदिवासी उद्योजक बँकेत गेल्यास बँक त्यांना सहकार्य करीत नाही. त्यामुळे बरेचदा ते अपयशी ठरतात. या मार्गदर्शनातून निर्धार करुन आदिवासी समाजातील होतकरु उमेदवारांनी मी उद्योजक होणार अशी मनी निश्चय केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
आदिवासी समाजाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी आदिवासी समाजाला दूरदृष्टी देणे गरजेचे आहे, असे सांगितले. त्यांनी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घेवून अमृत वर्षात नवजोमाने उद्योगाकडे वळावे, आदिवासी समाज उद्योग विरहित असल्याने त्यांनी उद्योगक्षम व्हावे. मेक इन महाराष्ट्रमुळे राज्यात अनेक उद्योजक झाले आहे. त्यानुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात मेक इन गडचिरोली उपक्रम राबविण्यात आला होता. त्याद्वारे उद्योगास चालना दिली गेली. रोजगार निर्माण करणारा उद्योजक आदिवासी बनला पाहिजे. यासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विदर्भात आदिवासीसाठी उद्योगाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून त्याबाबत मेळाव्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाकडे मोठ्या प्रमाणावर जमीन आहे त्याचा उपयोग मत्स व्यवसायासाठी करा. प्रधानमंत्री मत्स संपदा योजनेचा लाभ घ्या, ते म्हणाले.
आदिवासी समाजातील उद्योजक व्हावे, यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. आदिवासी युवकात ऊर्जा आहे, परंतु त्याचा योग्य उपयोग होत नाही. ट्रायबल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री महाराष्ट्राच्या सहकार्याने त्यांना उद्योग क्षेत्रात आणण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. समाजातील दरी कमी व्हावी हा त्यामागील उद्देश आहे. नव उद्योजक तसेच उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विभागाद्वारे प्रयत्न करण्यात येत असून हा मैलाचा दगड आहे, असे ते म्हणाले.
यावेळी तनवीर मिर्झा, संस्कृती कुलकर्णी व इतर अनेक मान्यवरांनी यावेळी  प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. प्रारंभी  भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांना गोंडी पेंटींग देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमास मोठया संख्येने आदिवासी समाजातील युवक -युवती, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.






  Print






News - Nagpur




Related Photos